Election Commission | लोकसभेसह ‘या’ पाच राज्यात विधानसभा निवडणूकांची घोषणा होणार का? निवडणूक आयोगाकडे लक्ष
Election Commission | देशाच लक्ष आज दुपारी 3 वाजता होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सकडे लागलं आहे. निवडणूक आयोग आज देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. लोकसभेसह देशात आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
नवी दिल्ली : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा सुरु असताना आज 2024 लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात आपला रिपोर्ट सादर केलाय. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्रच होतील अशी चर्चा आहे. लोकसभेसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. आज 3 वाजता या बद्दल समजेल.
आंध्र प्रदेश, ओदिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ जून महिन्यात वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. आता लोकसभा निवडणुका एप्रिल-मे पर्यंत सुरु राहतील. त्यामुळे वरील राज्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
या राज्यात विधानसभा निवडणूक कधी?
मागच्यावर्षी सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर 2024 मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. एप्रिल-मे महिन्यात निवडणूका घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने कुठलीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. अनुच्छेद 370 संपवल्यानंतर जम्मू-काश्मीरच विभाजन केलं. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आहेत. लोकसभेसोबत काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यास अनुच्छेद 370 संपवल्यानंतर ही पहिली निवडणूक असेल. परिसिमननंतर इथे विधानसभेच्या जागा इथे 83 वरुन 90 झाल्या आहेत.
या राज्यात भाजपाने विधानसभेसाठी उमेदवारही जाहीर केलेत
लोकसभेसोबत अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार यावर भाजपाने शिक्कामोर्तब केलय. पक्षाने आपल्या 60 उमेदवारांची घोषणा सुद्धा केली आहे. 2019 मध्ये आंध्र प्रदेशात लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या.