Chandrayaan-3 | चंद्रावर जाण्यासाठी उरले फक्त 2 दिवस, पंतप्रधान मोदी लाँचला उपस्थित राहणार का?
Chandrayaan-3 | अपयश मागे सोडून इस्रो पुन्हा एकदा नवीन झेप घेण्यासाठी सज्ज आहे. भारताच चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावायला फक्त 2 दिवस उरले आहेत. जाणून घ्या या मोहिमेबद्दल.
नवी दिल्ली : भारताच्या बहुचर्चित चांद्रयान-3 मिशनला आता दोन दिवस उरले आहेत. येत्या 14 जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावेल. या मिशनच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग हा या मोहिमेतील सर्वात अवघड टप्पा असणार आहे. चंद्रावर लँडिंगचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असणार आहे.
शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावेल. चंद्रावर जाणाऱ्या अवकाश यानात लँडर आणि रोव्हर आहे.
याधीच मिशन शेवटच्या स्टेजमध्ये फेल
चांद्रयान 3 च्या लाँचची तयारी प्रगतीपथावर आहे, असं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं. चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मधील फरक त्यांना विचारण्यात आला, त्यावर सोमनाथ यांनी सांगितलं की, “याआधीच मिशन शेवटच्या टप्प्यात काही छोट्या कारणांमुळे फेल झालं होतं. त्या चूका आता शोधून दुरुस्त करण्यात आल्या आहेत तसच चांद्रयानच्या एकूण सिस्टिममध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत”
मोदी उपस्थित राहणार का?
भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेच्या लाँचच अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे, असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाँचच्यावेळी उपस्थित राहणार का? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “आम्ही सर्वांना निमंत्रण दिलय, आता यायच की, नाही ते त्यांच्यावर अवलंबून आहे” इस्रोच्या तत्कालिन प्रमुखांच्या डोळ्यात होते अश्रू
2019 साली चांद्रयान-2 च्या लँडिंगवेळी पंतप्रधान मोदी इस्रोच्या कक्षात उपस्थित होते. मिशन लास्ट टप्प्यात फेल झाल्यानंतर मोदींनी दुसऱ्यादिवशी सकाळी इस्रोच्या कार्यालयात येऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला होता. त्यांचा आत्मविश्वास उंचावला होता. त्यावेळी इस्रोचे तत्कालिन प्रमुख के.सिवन यांच्या डोळ्यात अश्रू होते. मोदींना निरोप देताना सिवन यांचे डोळे पाणावले. त्यावेळी मोदींनी त्यांची पाठ थोपटून आत्मविश्वास वाढवला होता.