WITT Satta Sammelan | पाकिस्तानच्या मुसलमानांना भाऊ मानतात का?; ओवैसी यांचं उत्तर काय?
मोदींना तिसऱ्यांदा सत्तेपासून दूर ठेवणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ज्यांना पंतप्रधान व्हायचं आहे, त्यांना हा सवाल करा. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावेत असं आम्हाला वाटत नाही. ज्यांना स्वत:ला पंतप्रधान व्हायचं आहे, त्यांनाच तुम्ही हा सवाल करा. मी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत नाही. ही मोठ्या लोकांची स्वप्नं आहेत. मी जिथे आहे, तिथे खूश आहे, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात आज एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी हजेरी लावली. तीन दिवसाच्या या कार्यक्रमाचा आज समारोप आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात येऊन ओवैसी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राजकारण, निवडणुका आणि धार्मिक राजकारण या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ नये, अशी इच्छाही असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात ऑल इंडिया भाईजान या परिसंवादात असदुद्दीन ओवैसी यांनी संवाद साधला. यावेळी अमेरिकेतील एका मुलांना त्यांना एक सवाल केला. ओवैसी पाकिस्तानातील मुसलमानांना भाऊ मानतात का? असा सवाल त्यांना या मुलाने केला. त्यावर ओवैसी यांनी उत्तर दिलं. 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं. 200 वर्षाच्या गुलामीतून आपण मुक्त झालो. आज 2024मध्ये तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहात. आपण जिन्ना यांच्या द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत नाकारलेला आहे, असं असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं.
शेजाऱ्यांशी चांगले संबंध असावे
एखाद्या मुसलमानाला हा सवालच विचारायला नको होता. आपण द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत नाकारला आहे. आम्ही याच भूमीला आपला देश मानलं आहे. आणि या भूमीलाच आपला देश मानत राहू. त्यामुळे असा प्रश्न करणं चुकीचं आहे. हां, पण शेजाऱ्यांसोबत आपले संबंध चांगले असायला हवेत, असं सांगतानाच आधी काय होतं हे मला आठवत नाही, असं ओवैसी म्हणाले.
तर भविष्यात अडचणी
आस्थेच्या पार्श्वभूमीवर कोर्ट निर्णय देत आहे. पुढे हीच समस्या होणार आहे. आस्थेच्या पार्श्वभूमीवर निर्णय दिले गेले तर भविष्यात अडचणी उभ्या राहतील. या निर्णयानंतर अनेक मागण्या होतील याची मला भीती होती. ती आता खरी व्हायला लागली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीवर भाष्य
समान नागरी कायद्यावरही त्यांनी भाष्य केलं. तुम्ही आमच्यात का रिफॉर्म करत आहात. तुम्ही तुमचा हिंदू मॅरेज अॅक्ट आमच्यावर थोपवू पाहत आहात. तुमच्या नैतिकता माझ्यावर का थोपवत आहात. तुम्ही प्रोहिबिटेड लिस्ट तयार केली आहे. उत्तराखंडमध्ये यूसीसीतून आदिवासींना का वगळण्यात आलंय? असा सवाल त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीतील आघाडीवरूनही त्यांनी भाष्य केलं. पक्षात अजून चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. आमची छोट्या राजकीय पक्षांशी युती होईल. या मंचावर सर्व काही सांगता येत नाही. अखिलेश यादव यांच्याशीही आघाडी होऊ शकली नाही, असंही त्यांनी सांगितलं.