Satta Sammelan | आम्हाला डिवचाल तर सोडणार नाही; राजनाथ सिंह यांचा थेट इशारा
भाजपमधील आयारामांवर राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणी आमच्याशी दोस्ती करत असेल तर आम्ही त्यांना बाहेर का करावं? भाजपचा परिवार चांगला आहे, असं त्यांना वाटत असेल तर त्यांना कसं बाहेर काढणार? आम्ही काय कुणावर जबरदस्ती करत आहोत का? देशाला शिखरावर नेण्याचं काम मोदी सरकारचं करत आहे, म्हणून इतर लोक आमच्यासोबत येत आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : आम्ही कुणाला डिवचणार नाही, आम्हाला डिवचलं तर आम्ही सोडणार नाही. ही आमची नीती आहे, असा इशारा देतानाच ज्याने कधीच कुठल्याही देशावर हल्ला केला, आक्रमण केलं नाही. शेजाऱ्याच्या एक इंच जागेवरही ताबा सांगितला नाही, असा भारत जगातला एकमेव देश आहे. याबाबत भारतावर कुणीही बोट ठेवू शकत नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये बोलत असताना राजनाथ सिंह यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी देशाच्या परराष्ट्र नीतीवरही भाष्य केलं.
पीओकेची चिंता करू नका. तिथले लोकच भारतात येण्याची मागणी करतील. दीड वर्षापूर्वी काश्मीर व्हॅलीत माझा कार्यक्रम होता. तेव्हाच मी तिथल्या जनतेला संबोधित केलं होतं. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचे लोक भारतात यायला उत्सुक होतील, असं मी म्हटलं होतं. तिथले लोक भारतात यायला उत्सुक आहेत. या पुढे काय काय होतं ते पाहा, असं सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केलं. तसेच शांततेच्या काळातही कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या सैन्याला तयार राहिलं पाहिजे. कुणावर आक्रमण करण्यासाठी नव्हे तर आपल्या संरक्षणासाठी ही तयारी असली पाहिजे, अशा सूचना लष्कराला दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
झुकून चर्चा नाही
चीनसोबत चांगली चर्चा सुरू आहे. चिंतेचं कारण नाही. सार्वजनिकरित्या काही गोष्टी स्पष्ट केल्या जात नाहीत. चीनशी चर्चा करताना ही चर्चा झुकून केली जात नाही, एवढं समजून जा. देशाचं मस्तक कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकू देणार नाही. चीन आमच्यासोबत चर्चेला तयार आहेत. म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही कमजोर आहोत असं नाही. आम्ही चर्चेसाठी चीनला जबरदस्ती केली नाही. त्यांनीही केली नाही. ते आमच्याशी चर्चा करतात यातच सर्व काही समजून जा. आता समजून जा काही ना काही आहे. ते काय आहे हे सांगणार नाही, असं सूचक विधानही राजनाथ सिंह यांनी केलं.
राहुल गांधींनी आश्वस्त राहावं
चीनने भारताच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. भारताच्या जमिनीवर चीनने कंन्स्ट्रक्शन कधी केलंय केव्हा केलंय मला माहीत नाही. ते राहुल गांधी यांनाच माहीत असेल. आपल्या सैन्याच्या पराक्रमावर त्यांनी शंका उपस्थित करू नये. देशाचं मस्तक कधीच झुकू देणार नाही, याबाबत राहुल गांधी यांनी आश्वस्त राहावं. चीन जर त्यांच्या देशात बांधकाम करत असेल तर आम्ही का रोखावं? असा सवालही त्यांनी केला.