WITT Satta Sammelan | संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करणार? अमित शाह यांचं मोठं वक्तव्य
"तुमच्यासाठी समान नागरी कायदा हा राजकीय मुद्दा असेल. पण हा सामाजिक सुधार आहे. धर्माच्या आधारे कायदा नसावा. लोकांच्या हितासाठी हे कायदे असावे. संविधान सभेनेही योग्यवेळी समान नागरी कायदा आणावी असं सूचवलं आहे. भाजपची स्थापना झाल्यापासून आम्ही त्यावर बोलत होतो", अशी भूमिका अमित शाह यांनी मांडली.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी कायदा देशात लागू करणार का? या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिलं आहे. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात त्यांनी याबाबत भूमिका मांडली. “तुमच्यासाठी समान नागरी कायदा हा राजकीय मुद्दा असेल. पण हा सामाजिक सुधार आहे. धर्माच्या आधारे कायदा नसावा. लोकांच्या हितासाठी हे कायदे असावे. संविधान सभेनेही योग्यवेळी समान नागरी कायदा आणावी असं सूचवलं आहे. भाजपची स्थापना झाल्यापासून आम्ही त्यावर बोलत होतो. आमची नवी गोष्ट नाही. पक्ष तयार झाल्यापासूनची ही गोष्ट आहे. संविधान सभेत नेहरूपासून केएम मुन्शीपर्यंत सर्व लोक होते. त्यांनीच हे मांडलं आहे. काँग्रेसला काय झालं ते कळत नाही. कमीत कमी पणजोबाचं म्हणणं तरी समजलं पाहिजे”, असं अमित शाह म्हणाले.
“निवडणुकीनंतर सर्व राज्य विचार करेल आणि संपूर्ण देशात लागू केला जाईल. महत्त्वाची सुधारणा आहे. सोशल रिफॉर्म आहे. त्यावर खुली चर्चा झाली पाहिजे. यूसीसी काय आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे. त्याचा इतिहास सांगितला पाहिजे”, असं अमित शाह म्हणाले.
‘वारंवार निवडणुका होणं योग्य नाही’
“हिंदू कोडबिल नाही. हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न नाही. संभ्रमित करण्याचा प्रयत्न आहे. हिंदू धर्मातील लोाकंनीही अनेक गोष्टी स्वीकारल्या . हुंडा कायदा, सती प्रथा, हिंदुतील बहुपत्नीत्व होतं तेही रद्द झालं. कुणी विरोध केला नाही. पण चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहे”, असं भूमिका अमित शाह यांनी मांडली. यावेळी अमित शाह यांनी वन नेशन वन इलेक्शन संकल्पनेवरही प्रतिक्रिया मांडली. “वारंवार निवडणुका होणं योग्य नाही. खर्च वाढतो. देशाला परवडणारं नाही. योग्य वेळी कारवाई करू”, असं अमित शाह म्हणाले.
शाह यांची राहुल गांधींवर टीका
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. “राहुल गांधींना तुमच्या शिवाय कोणी देशात गंभीरपणे घेत नाही. राहुल गांधींना माहीत नाही या देशातील ओबीसींवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसनेच केला. काका कालेलकर आयोग तसाच पडला. मंडल कमिशनही लागू केला नाही. तो व्हीपी सिंगने लागू केला. ओबीसी कमिशन कधी काँग्रेसने बनवलं नाही. नीटमध्ये कधी काँग्रेसने ओबीसींना आरक्षण दिलं नाही. हे सर्व मोदींनी केलं आहे. कुणी तरी त्यांना लिहून दिलं आणि ते बोलत आहेत”, अशी टीका शाह यांनी केली.