बागेश्वर बाबाच्या दरबारात गेलेला नवरा परतलाच नाही, सर्व भक्तांना विचारलं; महिलेला रडू अवरेना…
बागेश्वर बाबा यांच्या दरबारातून एक शिक्षक गायब झाला आहे. चार महिने झाला तरी तो सापडलेला नाही. त्यामुळे या महिलेने शेवटी राज्याच्या एका मंत्र्याकडे धाव घेतली आहे.
पटणा : बागेश्वर बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारातून आलेल्या एका महिलेने गंभीर आरोप केला आहे. बागेश्वर बाबांच्या दरबारात गेलेला आपला नवरा परतलेलाच नसल्याचा दावा या महिलेने केला आहे. चार महिन्यापूर्वी तिचा नवरा बागेश्वर बाबांच्या दरबारात गेला होता. तो अजून परतला नाही. चार महिन्यानंतरही नवरा न आल्याने तिने बागेश्वर बाबांच्या दरबारात धाव घेतली. तिथल्या अनेक भक्तांकडे विचारणा केली. पण कुणालाच तिच्या नवऱ्याचा थांगपत्ता नाहीये. त्यामुळे ही महिला अक्षरश: केविलवाणी झाली. तिला रडू अवरेनासं झालं.
ललन कुमार असं या महिलेच्या नवऱ्याचं नाव आहे. तो 36 वर्षाचा असून पेशाने शिक्षक आहे. तो दरभंगा जिल्ह्यातील बहेडी प्रखंडच्या बघोनी गावातील वॉर्ड क्रमांक दोन येथील राहणारा आहे. चार महिन्यापूर्वी तो बागेश्वर बाबाच्या दरबारात गेला परत आलाच नाही. बागेश्वर बाब पटनाला येत असल्याचं माहीत पडल्यानंतर ही महिला तिच्या ननदेसोबत बाबाच्या दरबारात गेली. पण काहीच फायदा झाला नाही. या महिलेला बाबाशी भेटू दिलं नाही.
दोन दिवसात येतो म्हणाला…
नवऱ्याचा शोध घेणाऱ्या या महिलेचं नाव सविता कुमारी आहे. पतीची कुठेच माहिती मिळत नसल्याने या महिलेने राज्याचे मंत्री तेज प्रताप यादव यांच्याकडे धाव घेतली आहे. बागेश्वर बाबाच्या दरबारातून लोक का गायब होत आहेत? असा सवाल तिने केला आहे. माझा नवरा बागेश्वर धामला गेला होता. 6 फेब्रुवारीच्या 10 वाजल्यापासून त्याचा फोन बंद येत आहे. फोन बंद येण्यापूर्वी बागेश्वर बाबाचं दर्शन घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. दोन दिवसात घरी येतो म्हणूनही त्याने सांगितलं होतं. पण चार महिने उलटले तरी तो आलेला नाही. त्याला वारंवार फोन लावला. पण त्याचा फोन बंद येत आहे. मी पतीची रोज वाट पाहत आहे, असं सविता कुमारीचं म्हणणं आहे.
कुंकुवाचं रक्षण करा
मी बागेश्वर बाबाच्या दरबारातील सर्व लोकांना माझे पती कुठे गेले याची माहिती देण्याचं आवाहन केलं. तुम्ही माझ्या कुंकुवाचं रक्षण करा असंही आवाहन केलं. बाबांच्या दरबारातून लोक का गायब होत आहेत? लोक का सापडत नाहीये, असं तिचं म्हणणं आहे.
आतापर्यंत 40 लोक गायब
मध्यप्रदेशातील बरैठा पोलीस ठाण्यातील रिपोर्टनुसार 1 जानेवारीपासून आतापर्यंत बाबाच्या दरबारातून 40 लोक गायब झाले आहे. त्यापैकी 28 लोक सापडले आहेत. लोक अचानक गायब का होत आहे? काय षडयंत्र रचलं जात आहे. मध्यप्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. मी चार वेळा बाबाच्या दरबारात गेले. पण कोणीच माझं ऐकलं नाही, अशी व्यथाही या महिलेने व्यक्त केली आहे.