लखनऊ | 25 सप्टेंबर 2023 : लखनऊमधील भाजपचे आमदार योगेश शुक्ला यांच्या सरकारी निवासस्थानी एका तरुणाने जीवन संपवलं आहे. हा तरुण योगेश शुक्ला यांच्या परिचयाचा असल्याचं सांगितलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी त्याने योगेश फोन केला होता. मी मरायला जातोय, असं त्याने योगेश शुक्ला यांना फोन करून सांगितलं होतं. हा फोन येताच आमदार योगेश शुक्ला यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
योगेश शुक्ला यांच्या फोननंतर पोलिसांनी तात्काळ योगेश यांच्या घरी धाव घेतली. पण पोलीस येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांना या तरुणाचा मृतहेद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
या तरुमाने जीवन संपवलं तेव्हा फ्लॅटमध्ये कोणीच नव्हतं. आमदार योगेश यांच्या फ्लॅट नंबर 804मध्ये रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान त्याने गळफास घेतला. मात्र, या तरुणाने असं का केलं? त्यामागचं कारण काय? तो योगेश यांच्या फ्लॅटवर आला कसा? याची माहिती पोलीस घेत आहेत. हा तरुण बारांबाकीच्या हैदरगड येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातं. तो योगेश शुक्ला यांच्या मीडिया सेलचं काम करत होता.
पोलीस जेव्हा योगेश यांच्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावला तेव्हा आतून काहीच उत्तर आलं नाही. त्यानंतर पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. पोलीस आत गेल्यावर आत या तरुणाचा मृतदेह दिसला.
फ्लॅटमध्ये कोणतीच चिठ्ठी सापडली नाही. कोणतीही संदिग्ध वस्तू सापडली नाही, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. पोलिसांनी या तरुणाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. गेल्या काही दिवसात या तरुणाने कुणाकुणाशी संवाद साधला याची माहिती घेतली जात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.