महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर? ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस, तर भाजपसाठी सकारात्मक वातावरण!
काँग्रेससोबत आघाडी म्हणजेच यूपीए म्हणून लढल्यास नेतृत्व काँग्रेसकडेच असेल. मोदींविरोधातील आघाडीचं नेतृत्वं आपल्याकडे राहावं, असा प्रयत्न ममतांचा आहे. काँग्रेसकडे सध्या मोदींना टक्कर देईल असा चेहरा नाही, असा सूर आहे.

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होत्या. ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल बैठक पार पडली. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी 2024 साठी मोदींविरोधात मजबूत आघाडी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्या आघाडीत त्यांना काँग्रेस नको असाच सूर आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या त्या टीकेवर मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांचीही खलबतं झाली आणि ममतांनी अहंकारात बोलू नये, असा पलटवार नाना पटोलेंनी केलाय.
दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे : फडणवीस
ममता बॅनर्जींच्या टीकेनंतर, फडणवीसांनाही बोलण्याची संधी मिळाली. शरद पवार राज्यात काँग्रेससोबत असल्यानं थेट बोलत नाही. मात्र ममता बॅनर्जी आणि पवारांचं एकच मत आहे. काँग्रेसला बाजूला करुनच आघाडी करण्याची त्यांची रणनीती आहे, असं फडणवीस म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना भक्कम पर्याय देण्यासाठी ममतांनी पुढाकार घेतलाय. मात्र त्यांना काँग्रेस नकोय.
तिसरी आघाडी झाल्यास भाजपलाच अधिक फायदा
काँग्रेससोबत आघाडी म्हणजेच यूपीए म्हणून लढल्यास नेतृत्व काँग्रेसकडेच असेल. मोदींविरोधातील आघाडीचं नेतृत्वं आपल्याकडे राहावं, असा प्रयत्न ममतांचा आहे. काँग्रेसकडे सध्या मोदींना टक्कर देईल असा चेहरा नाही, असा सूर आहे. राहुल गांधींना नेता मानण्यास ममता बॅनर्जी तयार नाही. त्या उघडपणे टीका करतायत. काँग्रेसला सोबत घेतल्यास अधिक जागा काँग्रेसलाच द्याव्या लागतील, असे त्यांचे मत आहे. मात्र काँग्रेसला सोडून जर तिसरी आघाडी झालीच, तर त्याचा अधिक फायदा हा भाजपलाच होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस आणि जी तिसरी आघाडी स्थापन होईल यांच्यातच मतांचं विभाजन होईल, असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचीही काँग्रेसवर टीका
इकडे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसवर नेतृत्वावरुन टीका केली आहे. विरोधक मजबूत असावेत यासाठी काँग्रेस ज्यापद्धतीनं विचार आणि विस्ताराचे प्रतिनिधीत्व करते ते गरजेचं आहे. मात्र विरोधकांचं नेतृत्व करण्याचा काँग्रेसला दैवी अधिकार मिळालेला नाही. विशेष म्हणजे 10 वर्षांत 90 टक्के निवडणुका हरलेल्या पक्षाला हा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीनं विरोधकांना त्यांचं नेतृत्व ठरवू द्या, असे प्रशांत किशोर म्हणाले.
The IDEA and SPACE that #Congress represents is vital for a strong opposition. But Congress’ leadership is not the DIVINE RIGHT of an individual especially, when the party has lost more than 90% elections in last 10 years.
Let opposition leadership be decided Democratically.
— Prashant Kishor (@PrashantKishor) December 2, 2021
खरं तर मोदींविरोधात आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न 2019 च्या निवडणुकीआधीही झाला. त्याहीवेळी ममता बॅनर्जींनीही देशभरातल्या विरोधकांना बंगालमध्ये एकाच स्टेजवर आणलं होतं. मात्र त्याहीवेळी लढाई नेतृत्वासाठीच होती. पण नेतृत्वाची लढाईच नाही, हे शिवसेनेलाही सांगावं लागतंय.
यूपीए नाही, एनडीएही नाही, नेतृत्वाची लढाई नाही
2014 मध्ये मोदींनी मोठी उडी घेत मुख्यमंत्रिपदावरुन थेट पंतप्रधानपदी विराजमान झाले. 2019 च्या निवडणुकीत तर 303 जागा जिंकून देशातली एक हाती सत्ता मिळवली. त्यामुळे मोदींना 2024 मध्ये टक्कर द्यायची असेल तर, विरोधकांची एकजूट महत्वाची आहे. मात्र आतापासूनच नेतृत्वाची लढाईवरुनच, काँग्रेससोबतच ममतांचे खटके उडतायत. (After Mamata Banerjee’s Mumbai tour, Mahavikas Aghadi collapses, Positive atmosphere for BJP)
इतर बातम्या
Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?