समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेवरुन पहिल्यांदाच ठाकरे विरुद्ध ठाकरे! अमित ठाकरेंचे आदित्य ठाकरेंना सवाल
अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेनं राज्यभर समुद्र किनारे स्वच्छतेची मोहिम राबवली. महाराष्ट्रातल्या जवळपास 40 समुद्र किनाऱ्यांवर मनसेनं स्वच्छता केली. मात्र ज्या मुंबई महापालिकेत शिवसेना 25 वर्षांपासून सत्तेत आहे, त्यांनी आजवर काय केलं, असा प्रश्न करत अमित ठाकरेंनी थेट आदित्य ठाकरेंना केलाय.
मुंबई : महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यांवरच्या (Clean up the Beach) अस्वच्छतेवरुन राजकीय चिखलफेक सुरुय झाली आहे. समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेवरुन पहिल्यांदाच ठाकरे विरुद्ध ठाकरे असे आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे आहे राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray). अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेनं राज्यभर समुद्र किनारे स्वच्छतेची मोहिम राबवली. महाराष्ट्रातल्या जवळपास 40 समुद्र किनाऱ्यांवर मनसेनं स्वच्छता केली. मात्र ज्या मुंबई महापालिकेत शिवसेना 25 वर्षांपासून सत्तेत आहे, त्यांनी आजवर काय केलं, असा प्रश्न करत अमित ठाकरेंनी थेट आदित्य ठाकरेंना केलाय.
“परदेशातील समुद्र किनारे स्वच्छ, चकाचक असू शकतात, मग आपले समुद्रकिनारे गलिच्छ, बकाल का असतात?” असा सवाल मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. “सत्ताधाऱ्यांकडे इच्छाशक्ती नाही, आपणच आपले समुद किनारे स्वच्छ ठेवूया असा टोलाही त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. शनिवारी सकाळी 11 वाजता अमित ठाकरे आपली आई शर्मिला ठाकरे यांच्या समवेत दादर समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. दादर समुद्र किनाऱ्यावर चार हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यांमध्ये अपंग बांधवांचाही समावेश होता.
शर्मिला ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
फक्त अमित ठाकरे यांनीच नाही, तर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी सुद्दा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. कधी-काळी महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय झाला, मात्र तरी सुद्धा सर्रासपणे प्लॅस्टिक मिळतं कसं, असा प्रश्न त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येत आहे.
समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेचा विषय का सुटत नाही?
महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. पालघरपासून ते तळकोकणापर्यंत जागोजागी अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. ज्यात डहाणू, मार्वे मनोरी, वसई, गोराई, मुंबई, अलिबाग, मालवण, तारकर्ली सहीत अनेक समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, इथल्या अनेक समुद्र किनाऱ्यांवरच्या स्वच्छतेचा विषय अनेक वर्षांपासून सुटलेला नाही.
आज सकाळी ११ वाजता श्री. अमितजी ठाकरे आणि ‘सावित्री प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत दादर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. जवळपास चार हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमी नागरिक या किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत.
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 11, 2021
मनसेच्या आरोपांमागे भाजपची स्क्रिप्ट- महापौर
मुंबईच्या महापौर मनसेच्या आरोपांमागे भाजपची स्क्रिप्ट असल्याचं म्हणत आहेत. अमित ठाकरे राजकीय प्रवासात थोडे लहान आहेत. भाजपाकडून स्क्रीप्ट लिहून दिली जाते. नाहीतर अमित ठाकरे सुसंस्कृत आहेत. ते अशा पद्धतीने रिअॅक्ट होणार नाहीत, असं महापौर म्हणाल्या. मात्र, याआधी स्वतः आदित्य ठाकरेंनी समुद्र किनारे स्वच्छतेत रस दाखवला होता. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामागे आदित्य ठाकरेंचाच पुढाकार होता. मात्र त्या निर्णयांचं पुढे काय झालं? याची उत्तरं तर मिळायला हवीत.
इतर बातम्या :