मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर, तब्येतीवरून चंद्रकांत पाटलांचे सवाल
ऑनलाईन बैठकीलाही हजर राहण्याएवढी उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नाही का ?, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पंतप्रधानांसमोर राज्याची परिस्थिती मांडली.
कोरोनाच्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM modi) 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. मात्र या ऑनलाईन बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav thackeray) गैरहजर राहिले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरुन चिंता व्यक्त केलीय. ऑनलाईन बैठकीलाही हजर राहण्याएवढी उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नाही का ?, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पंतप्रधानांसमोर राज्याची परिस्थिती मांडली. चंद्रकांत पाटलांनी चिंता व्यक्त केली असली. तरी काळजीचं काही कारण नाही, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय..मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2 तास ऑनलाईन उद्धव ठाकरे उपस्थित होते, त्यांची तब्येत चांगली आहे असं मुश्रीफ म्हणाले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
मोदींच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित नसले तरी, 4 जानेवारीला त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुंबईतील 227 शाखाप्रमुख, नगरसेवक आणि आमदारांची बैठक घेतली. आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेशही दिले.
त्याआधी मुंबईतील 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा सरकारनं जो निर्णय घेतला. त्याची घोषणा करण्यासाठी 1 जानेवारीला उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संबोधित केलं आणि त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचे कौतुकही केलं. तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नसले तरी लवकर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्यक्ष भेटीलाही येतील असा विश्वास मंत्री व्यक्त करतायत. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते मुख्यमंत्र्यांच्या तब्येवरून सवाल उपस्थित करत आहेत, अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सवाल उपस्थित गेले, चंद्रकांत पाटलांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रश्मी वहिनींकडे चार्ज द्यावा असे सांगितले, यावर मोठा राजकीय वादही झाला.