Corona Virus : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात? पुन्हा एकदा लॉकडाऊनचे वडेट्टीवारांचे संकेत!
राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे का? असा सवाल विचारला जातोय. मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तिसरी लाट आल्याचं घोषित करुन टाकलं आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढतेय. राज्यात आज 8 हजारापेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) सुरु झाली आहे का? असा सवाल विचारला जातोय. मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तिसरी लाट आल्याचं घोषित करुन टाकलं आहे. महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. रुग्णवाढ झाली तर लॉकडाऊनशिवाय पर्यात नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
राज्यातील लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये कोरोनाची विस्फोटक स्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे नियंत्रण लोकांच्या हाती आहे. आपण कसं राहायचं, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नयेत हे लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
आरोग्यमंत्र्यांचे कठोर निर्बंधांचे संकेत
पूर्णपणे लॉकडाऊन लागेल का, याबाबत साशंकता आहे. मात्र निर्बंध पुन्हा लागतील, याबाबतचं सुतोवाच खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यातील रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तो निर्णय आज उद्यामध्येच घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर दिली होती. त्यानंतर 30 डिसेंबरला रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
रुग्णवाढ सुरु, मात्र रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी
महाराष्ट्रासह देशातही जरुर रुग्णवाढ होतेय. मात्र दुसरी आणि संभाव्य तिसर्या लाटेतला फरक म्हणजे कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. उदाहरणार्थ…
>> मुंबईत काल 3671 कोरोनाचे रुग्ण सापडले >> त्यापैकी 1468 लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती >> फक्त 5 टक्के लोकांना सौम्य लक्षणं आहेत >> आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 5 टक्क्यांहून कमी रुग्ण दवाखान्यात भरती झाले आहेत
..तर नव्या वर्षाची सुरुवात कठोर निर्बंधातच
जरी तिसरी लाट सुरु झाल्याचं मान्य केलं, तरी ती लाट अद्याप तरी सौम्य आहे. बहुतांश लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. प्रवास किंवा इतर शस्रक्रियांसाठी चाचणी करताना अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतायत. पण, ओमिक्रॉन व्हेरियंट जर अजून म्युटेंट म्हणजे रुपांतरित झाला, तर नव्या वर्षाची सुरुवातच निर्बंधात होण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या :