राष्ट्रवादीच्याच आमदारांकडून अजित पवारांच्या आवाहनाला तिलांजली; अशोक पवारांच्या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अजित पवारांचंही राष्ट्रवादीचे आमदार ऐकत नाहीत का ?, असा प्रश्न पडतोय. त्याचं कारण म्हणजे खुद्द अजित पवारांनी 50 पेक्षा अधिक लोक असल्यास त्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलं, पण राष्ट्रवादीचेच आमदार अजित पवारांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई : अजित पवारांचंही राष्ट्रवादीचे आमदार ऐकत नाहीत का ?, असा प्रश्न पडतोय. त्याचं कारण म्हणजे खुद्द अजित पवारांनी 50 पेक्षा अधिक लोक असल्यास त्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलं, पण राष्ट्रवादीचेच आमदार अजित पवारांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करतायेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत, घोड्यावरुन मिरवणूक काढल्याचे पहायला मिळाले.
सणसवाडीत जंगी मिरवणूक
एकीकडे आरोग्य मंत्री रोज कोरोनाचा संसर्ग कसा वाढतोय, नेमके काय निर्बंध लागू शकतात? हे जनतेला सांगतायेत. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत, की 50 पेक्षा अधिक लोक जिथं असेल तिथं मी जाणार नाही. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादीचेच आमदार घोड्यावरुन मिरवणूक काढतायेत. सार्वजनिक मिरवणुका आणि कार्यक्रमांना निर्बंध घातले असतानाच, आमदार अशोक पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या सणसवाडीत जंगी मिरवणूक काढली.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जिकडे नजर जाईल तिकडे गर्दीचं गर्दी, सोशल डिस्टसिंगचा फज्जा, आपल्याच सरकारच्या नियमांचे तीन तेरा आणि मास्कचा विसर, हे सारं काही राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांच्या मिरवणुकीत पाहायला मिळालं. आता अशोक पवारांनी थेट घोड्यावरुन मिरवणूक का काढली, तर त्याचं कारण आहे नुकत्याच निवडणूक झालेल्या पुणे जिल्हा बँकेवर संचालकपदी झालेली निवड. त्यामुळं आनंदाच्या भरात आमदार महोदयांनी कोरोनाच्या नियमांना तिलांजली देत, जंगी मिरवणूक काढली. त्यामुळं प्रश्न हाच आहे, की जनतेवर कारवाई करणारं महाविकास आघाडीचं सरकार राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांवर कारवाईची हिंमत दाखवणार का ?
सामान्य जनतेकडूनही कोरोना नियमांचे उल्लंघन
हे झालं आमदारांचं पण सर्वसामान्य जनताही आरोग्यमंत्र्यांचं ऐकताना दिसत नाही. महाराष्ट्रभरात बाजारपेठांमध्ये अलोट गर्दी पाहायला मिळतीये. मुंबईतल्या दादरच्या भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लोकांना मास्कचाही विसर पडलाय. ठाण्यातही अशीच परिस्थिती आहे, जांभळी नाका इथल्या मुख्य बाजारपेठेत कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी होत आहे. पुण्यातल्या मार्केट यार्डात किती गर्दी झालीय, हे पार्किंगमधल्या गाड्या पाहिल्यावर सहज लक्षात येईल. भाजी खरेदीसाठी पुणेकर तुफान गर्दी करतायत. इकडे नागपुरातल्या कॉर्टन मार्केटचीही अशीच स्थिती आहे. नागपूरकरही विनामास्क फिरताना दिसत आहेत. जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळं जनता असो की लोकप्रतिनिधी सर्वांनीच गांभीर्यानं वागलं पाहिजे. कारण कोरोना कधी धडक देईल हे अजिबात सांगता येत नाही.
संबंधित बातम्या
Manda Mhatre | भाजप आमदार मंदा म्हात्रेंची लवकरच घरवापसी? जयंत पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण