गांधींबाबत संतापजनक वक्तव्य, कालीचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
कालीचरण बाबानं महात्मा गांधींबाबत संतापजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर करतानाच कालीचरणनं नथुराम गोडसेंना नमन केलंय.
छत्तीसगडमधील धर्मसंसदेत कालीचरण बाबानं महात्मा गांधींबाबत संतापजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर करतानाच कालीचरणनं नथुराम गोडसेंना नमन केलंय. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच कालीचरण बाबानं आणखी एक व्हिडीओ शेअर करत फासावर द्या मात्र माफी मागणार नाही असं म्हणत वादाला आणखी फोडणी दिली. कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटेल. मविआ नेत्यांनी कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण बाबाला अटक करा आणि ठेचा अशा शब्दात संताप व्यक्त केला.
अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे जोरदार आंदोलन
कालीचरण बाबाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. कालीचरण विरोधात अकोल्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय. तर महाराष्ट्रात आघाडीचं सरकार असताना कालीचरणला तुम्ही का अटक करत नाही, असा सवाल करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मविआ सरकारवरच निशाणा साधलाय. त्यामुळे अधिवशनातही कालीचरण बाबावरून वातावरण तापल्याचे पहायला मिळाले. कालीचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
कालीचरण बाबाचे आधीही वादग्रस्त वक्तव्य
कालीचरण बाबाचा हा काही पहिलाच वाद नाही. याआधी कोरोनावरून संतापजनक वक्तव्य करत कालीचरणनं आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान केला होता. आधी आरोग्य कर्मचारी आणि आता तर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणारनं वक्तव्य कालीचरण बाबानं केलंय. त्यामुळे कालीचरण बाबाविरोधात कडक कारवाई होणार का हे पाहावं लागेल.