Narayan Rane : लोकसभेतील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे नारायण राणे-शिवसेनेमध्ये खडाजंगी
डीएमकेच्या खासदार, कनिमोझी यांनी विचारलेला प्रश्न आपण नीट ऐकला आणि समजलाही. मात्र लोकसभा अध्यक्षांना असं वाटलं की मला प्रश्न समजला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा हिंदीत प्रश्न सांगितला, असं नारायण राणे म्हणाले.
मुंबई : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभेतील एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. डीएमकेच्या नेत्या कनिमोझी यांनी नारायण राणे यांना त्यांच्या खात्याबद्दल इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे नारायण राणे यांना नीट उत्तर देता आले नव्हते. यानंतर नारायण राणेंवर शिवसेनेने चांगलीच टीका केली होती. राणेंमुळे लोकसभेत महाराष्ट्राची मान खाली गेली, असे म्हणत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी राणेंचा चांगलाच समाचार घेतला होता. याच व्हायरल व्हिडीओवरुन आणि त्यानंतर शिवसेनेच्या टीकेनंतर आता खुद्द राणेंनी त्यावर प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले नारायण राणे?
डीएमकेच्या खासदार, कनिमोझी यांनी विचारलेला प्रश्न आपण नीट ऐकला आणि समजलाही. मात्र लोकसभा अध्यक्षांना असं वाटलं की मला प्रश्न समजला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा हिंदीत प्रश्न सांगितला, असं नारायण राणे म्हणाले.
कनिमोझींनी काय प्रश्न विचारला होता?
कोरोनामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारच्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, केंद्र सरकार पावलं उचलणार का ? , असा प्रश्न खासदार कनिमोझींनी नारायण राणेंना विचारला होता. हाच तो व्हिडीओ आहे, जो शिवसैनिकांनीही व्हायरल केला.
विनायक राऊतांचा खोचक टोला
यावरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातले राणेंचे प्रतिस्पर्धी विनायक राऊतांनीही राणेंना डिवचण्याची संधी सोडली नाही. लोकसभेत बोलण्याची राणेंची ही पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. लोकसभेत मलासुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, अशा शब्दात राऊत यांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे.
राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र
लोकसभेत जे काही घडलं आणि त्यानंतर व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देत असतानाच, राणेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. पवारांसाठी खुर्ची उचलतानाचा राऊतांचा व्हिडीओही व्हायरल होतोय. त्यावरुन राणेंनीही टीकेची संधी सोडली नाही. दरम्यान राणे असो की मग शिवसेनेचे नेते दोघेही एकमेकांवर टीकेची संधी शोधतच असतात.
इतर बातम्या
VIDEO: महापौरांना धमकीचं पत्रं, शंकाकुशंका आणि पडसाद दुसऱ्या दिवशीही!