सुरुवात प्राण्यांच्या वादानं शेवट सामोपचारानं, अजित पवारांच्या मतावर फडणवीस समाधानी कसे? वाचा सविस्तर
प्राण्यांवरुन वाद रंगल्यानंतर अखेर अधिवेशनाचा समारोप शहाणपणानं झाला. म्हणजे लोकप्रतिनिधींनी प्राण्यांवरुन दर्जाहीन टीका करणं योग्य नाही, यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं. मात्र सामान्यांच्या मनात रुखरुख हीच राहिली की, हा शहाणपणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सूचला.
मागचे अनेक दिवस प्राण्यांवरुन वाद रंगल्यानंतर अखेर अधिवेशनाचा समारोप शहाणपणानं झाला. म्हणजे लोकप्रतिनिधींनी प्राण्यांवरुन दर्जाहीन टीका करणं योग्य नाही, यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं. मात्र सामान्यांच्या मनात रुखरुख हीच राहिली की, हा शहाणपणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सूचला. किमान यावर अधिवेशनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच जर नीट चर्चा झाली असती, तर दिवसाला लाखो रुपये खर्चून होणाऱ्या अधिवेशनात अजून काही लोकहिताची कामं मार्गी लागू शकली असती.
फडणवीसांकडून अजित पवारांच्या मतावर समाधान व्यक्त
दुसरं आश्चर्य म्हणजे या अधिवेशनात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या एका मतावर समाधान व्यक्त केलं. कुणी चुकलं तर त्या आमदारांचं थेट वर्षभरासाठी निलंबन करणं योग्य नाही, असं सांगत अजित पवारांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपच्या मनातल्या खदखदीला फुकंर घातली. अधिवेशन समारोपाच्या शेवटच्या दिवसाचं दुसरं वैशिष्ठ्य म्हणजे अनेक आमदारांनी आमदारांच्याच अधिकारांची कैफियत मांडली. विशेष म्हणजे खुद्द अजित पवार सुद्धा काही अपवाद वगळता सर्वपक्षीय आमदारांच्या वर्तनाबद्दल थेटपणे बोलले.
दोन अधिवेशनांपासून भास्कर जाधव विरुद्ध भाजप
भास्कर जाधवांनी तर आमदारांना येणाऱ्या अडचणींवर बोलताना काही सरकारी बाबूंच्या मस्तवालपणावर नेमकेपणानं बोट ठेवलं. मागच्या दोन अधिवेशनांपासून भास्कर जाधव विरुद्ध भाजप असं चित्र राहिलंय. मात्र आज पहिल्यांदाच भास्कर जाधवांच्या विधानावर विरोधी बाकांवरचे आमदारही सहमत झाल्याचं दिसलं. दुसरीकडे भाजपचे सुधीर मुनगंटीवारही अधिकाऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवत होते. मात्र भाजपच्याच काळात सुधीर मुनगंटीवारांनी अधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये जी वाढ केली, त्याचा तोटा काय झाला, यावर भास्कर जाधवांनी भाष्य केलं. थोडक्यात समारोपाला का होईना, पण मांजर, कोंबडा, कुत्रा, डुक्कर याऐवजी माणसांवर सभागृहात शांततेनं चर्चा झाली. ज्या शांततेनं आणि भेडसावणाऱ्या गोष्टींवर या अधिवेशनाचा समारोप झाला, याच वातावरणात यापुढच्या अधिवेशनाची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा करुयात.