राजेश पायलट: ‘दूधवाला’ ते ‘केंद्रीय मंत्री’; इंदिराजींनाही म्हणाले होते, पाकवर बॉम्ब टाकलेत, लाठ्याकाठ्या झेलू शकत नाही?
हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा. ते रोज पहाटे 4 वाजता उठायचे. चुलत भाऊ नत्थीसिंह यांच्या दूध डेअरीत जाऊन म्हशींना चारा घालायचे. शेण साफ करायचे. गायी, म्हशींचे दूध काढायचे आणि दिल्लीतील (delhi) व्हीआयपी परिसरातील बंगल्यात जाऊन दूध पोहोचवायचे.
नवी दिल्ली: हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा. ते रोज पहाटे 4 वाजता उठायचे. चुलत भाऊ नत्थीसिंह यांच्या दूध डेअरीत जाऊन म्हशींना चारा घालायचे. शेण साफ करायचे. गायी, म्हशींचे दूध काढायचे आणि दिल्लीतील (delhi) व्हीआयपी परिसरातील बंगल्यात जाऊन दूध पोहोचवायचे. कधी कधी इतकी कडाक्याची थंडी पडायची की गोठ्याच म्हशींनाच चिपकून झोपायचे. या व्यक्तिचं नाव होतं राजेश्वर प्रसाद बिधुरी. नंतर हेच राजेश्वर प्रसाद बिधुरी हे राजेश पायलट (Rajesh Pilot) म्हणून प्रसिद्ध झाले. करियरमुळे आडनाव बदललं अन् राजकारणात आल्याने देशभरातील आदराचे नेते झाले होते. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) सर्वांना आपण कधीकाळी ‘चहावाला’ होतो असं सांगतात आणि आपला संघर्ष अधोरेखित करतात. तसेच राजेश पायलटही आपल्या मित्र परिवारात आपण एक साधा ‘दूधवाला’ होतो असं सांगायचे. एक साधा दूधवाला ते केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास निव्वळ थक्क करणाराच नाही तर अचंबितही करणारा आहे.
‘राजेश पायलट-अ बायोग्राफी’ या पुस्तकात पायलट यांचा जीवनसंघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे. त्या काळात पायलट माळी गवत कापायचे आणि राजेश पायलट हे गवत पोत्यांमध्ये भरायचे. नंतर पोते भरून भरून हे गवत म्हशींसाठी न्यायचे.
ड्रेससाठी एनसीसीत प्रवेश
1945 मध्ये जन्मलेल्या पायलट यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय होती. त्यांनी एका राजेश्वर मंदिर प्रसाद मार्गावरील म्यूनिसिपल बोर्डाच्या शाळेत शिक्षण घेतलं. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांचे किंवा मित्रांचे कपडे ते घालायचे. त्याच काळात ते एनसीसीमध्ये सहभागी झाले. एनसीसीत केवळ फुकटात यूनिफॉर्म मिळतो म्हणून त्यांनी एनसीसीत प्रवेश घेतला होता. त्यावेळी ते शाळेतील प्रत्येक अॅक्टिव्हिटीत ते भाग घ्यायचे.
हवाई दलप्रमुख बनायचं होतं
करियरसाठी त्यांनी भारतीय हवाई दलाची निवड केली. त्यांना हवाई दलाचा प्रमुख बनायचं होतं. तशी स्वप्न ते पाहायचे. हवाई दलात आल्यावर त्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. एकदा या ट्रेनिंग कॅम्पमध्ये हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अर्जुन सिंह आले होते. त्यांच्या छातीवर आणि खांद्यावर विंग्स आणि स्ट्राईप्स लावलेले होते. त्यावेळी ते मित्राला म्हणाले होते की, एक दिवस मीही या पदावर पोहोचेल आणि माझ्याही खाद्यावर आणि छातीवर विंग्स आणि स्ट्राइप्स लागलेले असतील.
पाक विरुद्धच्या युद्धात भाग
त्यांनी 1971च्या भारत-पाक युद्धात भागही घेतला होता. त्यांनी तब्बल 13 वर्ष हवाई दलात पायलट म्हणून सेवा दिली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ते राजकारणात आले. थेट गांधी कुटुंबामार्फत त्यांचा राजकारणात प्रवेश झाला.
काँग्रेस प्रवेशाचा अजब किस्सा
हवाई दलाचा राजीनामा दिल्यानंतर पायलट थेट इंदिरा गांधींना भेटले. त्यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याविरोधात बागपतमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, तुम्ही राजकारणात यावं हा सल्ला मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही हवाई दलाचा राजीनामा देऊ नका. कारण तिथे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यावर, मी राजीनामा देऊनच आलोय. मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असं पायलट यांनी इंदिरा गांधींना सांगितलं. त्यावर बागपतमधून लढणं कठिण काम आहे. तिथे निवडणूक काळात प्रचंड हिंसा होत असते, असं इंदिरा गांधी म्हणाल्या. इंदिजींचं हे उत्तर येताच राजेश पायलट यांनी तात्काळ उत्तर दिलं. मॅडम, मी विमानातून बॉम्ब टाकले आहेत. लाठ्याकाठ्यांचा सामना करू शकणार नाही का? असं राजेश पायलट म्हणाले. त्यावर इंदिरा गांधींनी काहीच आश्वासन दिलं नाही.
अन् पहिली निवडणूक जिंकले
1980मध्ये ते राजस्थानच्या भरतपूरमधून विजयी झाले. पायलट असल्यामुळे त्यांचे संजय गांधींशी जवळचे संबंध होते. नंतर ते राजीव गांधी यांचेही खास बनले. राजीव गांधी यांचे निकटवर्तीय असल्याने केंद्रीय सत्तेत नेहमी त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये घटना घडामोडींना वेग आला होता. त्यावेळी पायलट यांनीही खमकी भूमिका घेतली होती.
आडनाव बदललं त्याची गोष्ट
पायलट यांचं खरं नाव राजेश्वर प्रसाद सिंह बिधुडी होतं. भरतपूरमध्ये निवडणूक लढवण्यापूर्वी ते गावागावात दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना लोकांची कुजबुज कानावर आली. कोणी तरी पायलट येणार आहे, अशी चर्चा लोक करत असल्याचं त्यांच्या कानावर आलं. त्यामुळे त्यांनी आपलं नाव बदलून राजेश पायलट असं केलं. तीच त्यांची ओळख ठरली.
अध्यक्षपदासाठी लढले अन् पडले
1997मध्ये राजेश पायलट यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम केसरी यांच्या विरोधात ते उभे होते. या निवडणुकीत पायलट यशस्वी झाले नाहीत. सीताराम केसरी यांनी या निवडणुकीत पायलट आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांचा पराभव केला.
वावड्या उठल्या, पण…
पुढे सोनिया गांधी या सक्रिय राजकारणात आल्या. 1997मध्ये काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर सोनिया गांधी 1998मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. 1999मध्ये त्या कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशातील अमेठीतून विजयी झाल्या. त्यानंतर सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या चर्चांनी जोर धरला. त्यामुळे शरद पवार, तारीक अन्वर आणि पीए संगमा या नेत्यांनी काँग्रेस सोडली. त्यामुळे राजेश पायलटही काँग्रेस सोडतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र, ते काँग्रेसमध्येच राहिले.
दूधवाला म्हणून राहिले तिथेच केंद्रीय मंत्री म्हणून आले
संसदेच्यामागे गुरुद्वारा रकाबगंज रोड बनवला होता. एका नातेवाईकासोबत पायलट हे या रोडवरील 12 नंबरच्या कोठीतील एका सर्व्हंट क्वॉर्टर्समध्ये राहत होते. सुरुवातीच्या काळात या मार्गावरील कोठींमध्ये आणि लुटियंस दिल्लीतील अनेक कोठ्यांमध्ये दूध पुरवले होते. जेव्हा ते केंद्रीय मंत्री बनले तेव्हा याच घरात ते मंत्री म्हणून राह्यला आले होते.
राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन, जाणून घ्या नव्या दरबार हॉलची काही खास वैशिष्टेhttps://t.co/zRVYnYHu0h#ashokchavan #chiefministeruddhavthackeray #DeputyChiefMinisterAjitPawar #DurbarHall
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2022
संबंधित बातम्या:
डावी-उजवी विचारधारा म्हणजे काय रे भाऊ? या विचारधारा आल्या कशा? जनक कोण?