Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशात भाजपाची मुसंडी, महाराष्ट्रातलं ठाकरे सरकारवर संकट? बीएमसीचेही गणित बदलणार?
Election Result 2022 उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येताना दिसत आहे. भाजपला गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी जागांचा मोठा फटका बसला असला तरी सुरुवातीच्या कलानुसार भाजप यूपीत बहुमत गाठताना दिसत आहे.
मुंबई: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात (uttar pradesh)भाजपची सत्ता येताना दिसत आहे. भाजपला (bjp) गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी जागांचा मोठा फटका बसला असला तरी सुरुवातीच्या कलानुसार भाजप यूपीत बहुमत गाठताना दिसत आहे. त्यामुळे भाजपची आणि खासकरून मोदींची लाट अजूनही कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयाचा आता महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या निवडणुकांशीही संबंध जोडला जावू लागला आहे. उत्तर प्रदेशातील विजयामुळे लगेच भाजपच्या हातात मुंबई महापालिका (bmc) येणार नाही. पण उत्तर प्रदेशात निवडणूक जिंकण्यासाठी जे तंत्र वापरलं, जी रणनीती आखली गेली, तीच रणनीती मुंबई महापालिकेसाठी आखली जाऊ शकते. त्यामुळे महापालिकेतील गणितं बदलू शकतात, असा अंदाज आता वर्तवला जाऊ शकतो. भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रामुळे कोणत्याही राज्यात काहीही होऊ शकतं, असंही राजकीय सूत्रं सांगत असल्याने महाराष्ट्रात ठाकरे सरकारवर संकट आलंय का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
कल काय सांगतात?
सुरुवातीच्या कलनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 270 जागा मिळताना दिसत आहेत. तर समाजवादी पार्टीला 121 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय बसपाला केवळ पाच आणि काँग्रेसला केवळ तीन जागांवर विजय मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजपला यावेळी विधानसभेत समाजवादी पार्टीकडून कडव्या सामन्याला सामोरे जावं लागणार असल्याचं चित्रं आहे.
ठाकरे सरकार संकटात?
दरम्यान, उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होईल, असं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं गेलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंपासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी ठाकरे सरकार जाणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार संकटात आलंय का? अशी चर्चाही सुरू झाली आहे.
यूपीचा इम्पॅक्ट मुंबई महापालिकेवर होणार
उत्तर प्रदेशात जे निकाल आले त्यातून भाजपला बहुमत मिळाताना दिसत आहे. भाजपच्या जागा 300 पर्यंत जातील असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. असं असलं तरी मोदींची लाट कायम असून भाजपच्या बाजूने वातावरण असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यापूर्वी पंढरपूरच्या निवडणुकीत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही सिद्ध झालं होतं. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी एकत्र निवडणुका लढवूनही ते भाजपला चितपट करू शकले नाहीत. शिवाय भाजपने सातत्याने आंदोलनं करून आरोपांची राळ उठवून ठाकरे सरकारला घेरलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात सरकारविरोधी वातावरण करण्यात भाजपला यश आलं आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत होईलच. भाजपकडे राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, विद्या ठाकूर सारखे उत्तर भारतीय चेहरे आहेत. त्याचाही त्यांना उत्तर भारतीय मते खेचण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फायदाच होणार आहे, असं नवभारत टाईम्सचे राजकीय पत्रकार राजकुमार सिंह यांनी सांगितलं.
फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा होईल
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराला गेले होते. गोव्यातही ते प्रभारी होते. त्यामुळे या दोन्ही राज्यात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने केलेली तयारी फडणवीसांना माहीत आहे. त्याचा फायदा ते महापालिका निवडणुकीत करून घेतील. आधीच भाजपने मराठी कट्टा सुरू केला आहे. गुजराती व्होट बँक त्यांच्या हक्काची आहे. आता उत्तर भारतीय व्होटबँकही आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेला वाटते तितकी सोपी जाणार नाही. भाजपचं महापालिकेतील संख्याबळ भरपूर आहे. महापौर बसवण्यासाठी 30-35 जागा त्यांना हव्या आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपने रणनीती आखली असणार यात काही शंकाच नाही, असंही राजकुमार सिंह यांनी सांगितलं.
योगी स्टार प्रचारक असतील?
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा जादू चालली आहे. यावेळी उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार केला. त्यामुळे योगींवरच भाजपची सर्व मदार होती. जागा कमी मिळाल्या असल्या तरी योगी सत्ता राखण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने योगींना प्रचारक म्हणून बोलावल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूत्रांनी सांगितलं.
महापालिकेतील पक्षीय बलाबल काय?
शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1
संबंधित बातम्या: