मनुष्य गौरवाचा उद्गाता – पांडुरंगशास्त्री आठवले
Manushya gaurav Din 2023 : स्वाध्याय परिवार पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मदिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतो. स्वाध्यायच्या माध्यमातून दादांनी मानवी मुल्य खऱ्या अर्थाने मनुष्याच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. दादांनी दिलेल्या अनेक प्रयोगाच्या माध्यमातून आज मनुष्य खऱ्या अर्थाने जीवनात बदल आणत आहे.
आमोद दातार, मुंबई : १९ ऑक्टोबर हा दिवस म्हणजे तत्त्वचिंतक आणि वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांचा जन्मदिवस. १९ ऑक्टोबर हा या महापुरुषाचा जन्मदिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ‘मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा करतो. आपल्या देशांत असंख्य प्रज्ञावान व्यक्तिमत्त्वे जन्मली आणि पांडुरंगशास्त्री हे अशाच रचनात्मक कार्य करणाऱ्या दुर्मीळ महापुरुषांपैकी एक अग्रणी नाव. दादा नेहमी म्हणत की भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर भक्ती म्हणजे मी त्या भगवंतापासून विभक्त नाही ही पक्की समजूत. त्याच्या हृदयस्थ असल्यामुळे माझे अस्तित्व आहे ही भावपूर्ण समजूत भक्तीत नसेल तर केवळ फुले, हार, आरती, प्रसाद हे सर्व उपचारात्मक कर्मकांड अपूर्ण आहे. दादा नेहमी म्हणत की भारतीय तत्त्वज्ञानाने जगाला काय द्यावे? तर तत्त्वमसि हे वेदवाक्य. तत्त्वमसि म्हणजे तत् त्वम् असि, म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस. तुझा आणि त्याचा संबंध सांगणारे तीन अर्थ यात आहेत.
प्रथम तेन त्वम् असि – तू त्याच्यामुळे आहेस. तुझं बोलणं, चालणं, राहाणं सर्व त्याच्यामुळे आहे.
दुसरा तस्य त्वम् असि, म्हणजे त्याचा तू आहेस, तुझं आणि त्यांचं काहीतरी नातं आहे.
आणि तिसरा अर्थ म्हणजे तत् त्वम् असि, तोच तू आहेस, तू त्याच्यापर्यंत पोहोचू शकतोस.
मानवी आध्यात्मिक विकासाच्या या पायऱ्या आहेत. दादा नेहमी सांगत की तत्त्वमसि आणि अहं ब्रह्मास्मि सारखी महावाक्ये ही केवळ सिद्धांच्या अनुभूतीचा विषय नाहीत तर सामान्य साधकाला त्यांचा काठीसारखा उपयोग होतो. सारांश दादांनी हे प्रतिपादित केले की चराचर सृष्टि चालवणारी शक्ती तुझ्याबरोबर आहे, तुझा आणि त्याचा संबंध आहे. इतकंच नाही तर ती शक्ती जशी तुझ्याबरोबर आहे तशीच दुसऱ्याबरोबर सुद्धा आहे. त्यामुळे तुझा आणि दुसऱ्याचा परस्पर संबंध आहे. हृदयस्थ भगवंत, त्याचा संबंध आणि सर्वांत बसलेल्या त्या शक्तीमुळे आपल्या सर्वांचा परस्पर दैवी भ्रातृभाव उभा राहू शकतो हे दादांनी सांगितले.
भक्ती बनली सामाजिक शक्ती
दादा नेहमी म्हणत असत की जर भगवदशक्ती माझ्यात बसली आहे हे बुद्धीत उतरले, ती शक्ती माझ्या सर्व कृतींची साक्षी आहे हे समजलं तर व्यसन का नाही सुटणार? माणूस दुराचार करण्याआधी का नाही विचार करणार? आज एक दोन नाही तर हजारो स्वाध्यायी गावातून व्यसने हद्दपार झाली आहेत, तंटे मिटले आहेत, भेदाभेदांच्या भिंती हळूहळू गळून पडल्या आहेत; ते आंदोलने करून नाही तर केवळ हृदयस्थ भगवंताच्या जाणीवेतूनच. अर्थात दादांनी कधीही या परिवर्तनाची जाहिरात केली नाही कारण जाहिरात, प्रसिद्धी, बडेजाव करणं हा ना दादांचा स्वभाव होता ना त्यांच्या प्रचंड रचनात्मक कार्याचा हेतू. दादांनी भक्तीच्या संकल्पनेचं सामाजीकरण केले. ईश्वराच्या माझ्यातील अस्तित्वामुळेच मी करू शकतो, बदलू शकतो, बदलवू शकतो ही can do वृत्ती लाखो लोकांमध्ये उभी झाली. वैश्विक स्वाध्याय परिवाराच्या रूपाने एक वैकल्पिक समाज (Alternative society) उभा करून दाखवला.
मनुष्य गौरवाचा विचार
मनुष्य गौरवाचा विचार हे ही दादांचे एक अतुलनीय योगदान. दादा नेहमी म्हणत की आज समाजात बाह्य आभूषणांशिवाय गौरवच मिळत नाही. ज्याच्याकडे वित्त आहे, सत्ता आहे, विद्या आहे, कीर्ती आहे त्यालाच किंमत मिळते. पण ही सर्व आभूषणे नसतील तर माणसाला किंमतच नाही का? समाजातील बहुतांश लोकांकडे विद्या, वित्त, सत्ता, कीर्ती, यातील काहीच नाही आणि ते नसल्यामुळे जर त्यांना गौरव मिळणारच नसेल तर आपण खरोखरच सुधारलो आहोत का हा विचार करणे आवश्यक आहे. दादांनी ठामपणे सांगितले की तुझ्याकडे या प्रस्थापित शक्तींपैकी काहीही नसेल कदाचित, पण तुझ्याजवळ तुझा राम आहे, चराचर सृष्टी चालवणारा भगवंत माणसात येऊन राहिला आहे हाच माणसाचा सर्वात मोठा गौरव आहे. मनुष्याचा हा गौरव उभा करण्यासाठी पूजनीय दादांनी रक्ताचे पाणी केले.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
दादांना त्यांच्या अद्वितीय अशा रचनात्मक कार्यासाठी रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन अशा मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी तर पद्मविभूषण, लोकमान्य टिळक पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, राष्ट्रभूषण पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आनंदमयी पुरस्कार, चतुरंग जीवगौरव पुरस्कार अशा अनेकानेक राष्ट्रीय पुरस्कारांनी दादांना गौरविले गेले. अर्थात पुरस्कारांसाठी कधीही काम न केलेल्या दादांनी या सर्व पुरस्कारांचा भगवंताचे प्रेमपत्र या पवित्र भावनेने स्वीकार केला. अशा या मनुष्य गौरव प्रदाता दादांना आजच्या मनुष्य गौरव दिनी भावपूर्ण वंदन !