महाराष्ट्रात 10 हजारांच्या पार नवे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत! पश्चिम बंगाल, हरियाणानंतर महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित केला जातो आहे. सोमवारी तर तब्बल 12 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आल्यानं डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.
नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी, महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाचा असा काही विस्फोट झाला की रुग्ण संख्या थेट 10 हजारांच्या पार गेली. त्यामुळं महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊन जवळ आलाय, असं मंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय..विशेष म्हणजे पश्चिम बंगाल आणि हरियाणात मिनी लॉकडाऊन सुरु झालाय. महाराष्ट्रातली कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी पाहिली, तर निर्बंध कडक होतील असंच दिसतंय.
31 डिसेंबरला महाराष्ट्रात 8067 नवे रुग्ण आढळले. 1 जानेवारीला पुन्हा वाढ झाली आणि रुग्ण संख्या 9,170 वर पोहोचली. 2 जानेवारीला राज्यात 10 हजारांचा टप्पा पार झाला, तब्बल 11 हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी तर 12 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आलेत. महाराष्ट्रात 10 हजारांच्या वर नव्या रुग्णांची संख्या पोहोचलीय. तर पश्चिम बंगाल आणि हरियाणात रुग्णांचा वेग वाढताच, मिनी लॉकडाऊन लावण्यात आलंय…
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी 6 हजार 153 रुग्ण आढळले होते. हरियाणात 577 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर महाराष्ट्रात 12 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. पण अद्याप कठोर निर्णयांची घोषणा झालेली नाही. मात्र कठोर निर्णय घेतले जातील, असा सूर मंत्र्यांचा नक्कीच दिसतोय.
कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवारांनी नुकताच दिली. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवर आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अप्रत्यक्षपणे महत्त्वाचे इशारे दिले आहेत. महाराष्ट्रातही कठोर निर्णय लवकरच घेतले जाण्याची शक्यता आहे. तर लॉकडाऊनचे निकष सर्व राज्यात सारखेच असावेत, असं राजेश टापे यांनी म्हटलंय.
आता ज्या पश्चिम बंगाल आणि हरियाणात मिनी लॉकडाऊन लावण्यात आलाय..तिथं कशावर बंदी आहे, त्यावर ही एक नजर टाकुयात.
पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज, विद्यापीठ, स्पा, ब्यूटी पार्लर आणि सार्वजनिक उद्यानं बंद करण्यात आलेत. शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 50% उपस्थितीत असेल. 5 जानेवारीपासून मुंबई आणि दिल्लीहून प.बंगालसाठी सोमवारी, मंगळवारीच विमानांचं उड्डाणं होतील. तर इतर दिवस बंद असेल..
तर हरियाणातही, निर्बंध कठोर करण्याबरोबरच काही आस्थापनं बंद करण्यात आलेत. हरियाणातही शाळा, कॉलेज, ट्युशन क्लासेस, बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लस न घेतलेल्या नागरिकांना कार्यालय, रेस्टॉरंट, लग्न समारंभांना सहभागी होता येणार नाही.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित आमदारांची संख्या 25 इतकी झालीय. तर भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनाही कोरोनाची लागण झालीय. विशेष म्हणजे वडील राधाकृष्ण विखेंनाही कोरोना झाल्यावर सुजय विखेंनी निर्बंध आणि लॉकडाऊनला बोगसपणा म्हटलं होतं.
एकीकडे कोरोना झपाट्यानं वाढतोय.ओमिक्रॉनचीही धास्ती आहे. त्यातच बाजारपेठांमधली गर्दी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळं एक तर लोकांनी नियम पाळून गर्दी कमी करावी..नाही तर सरकारच कठोर पाऊल उचलेल, हे नक्की!