Nagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ! खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही!
राज्यातील राजकारणात अगदी कमी कालावधीत गोपीचंद पडळकरांची क्रेझ पाहायला मिळते. पण नगर पंचायत निवडणुकीत मात्र गोपीचंद पडळकरांना आपलं गोमग्राऊंड राखता आलेलं नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायतीत भाजपचा सुपडा साफ झालाय.
मुंबई : ओबीसी आरक्षणाचा विषय असो, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) असो की एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike), सर्वच विषयांवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) तुटून पडल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. शरद पवारांसह (Sharad Pawar) पवार कुटुंबातील सर्वांनाच अंगावर घेतानाही गोपीचंद पडळकर दिसतात. त्यामुळे राज्यातील राजकारणात अगदी कमी कालावधीत गोपीचंद पडळकरांची क्रेझ पाहायला मिळते. पण नगर पंचायत निवडणुकीत मात्र गोपीचंद पडळकरांना आपलं गोमग्राऊंड राखता आलेलं नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायतीत भाजपचा सुपडा साफ झालाय.
गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भाजप नेते जरी संपूर्ण निकालावरुन राज्यात विजयाचा दावा करत असले, तरी सांगलीत पडळकरांच्या पराभवाची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही.
जबाबदारी पार पाडण्यात पडळकर अपयशी
खानापूरच्या एकूण 17 जागांसाठी शिवसेना-काँग्रेसनं आघाडी केली होती. राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडी स्वतंत्र लढली आणि भाजपनंही स्वतंत्र उमेदवार उभे केले. शिवसेना-काँग्रेस आघाडीचं नेतृत्व आमदार अनिल बाबरांनी केलं, तर राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडीचे नेतृत्व माजी आमदार सदाशिव पाटलांकडे होतं. भाजपनं पहिल्यांदाच स्थानिक निवडणुकांची जबाबदारी पूर्णपणे गोपीचंद पडळकरांना सोपवली होती.
पडळकरांची वातावरणनिर्मिती कामी आलीच नाही
निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस आघाडीला 17 पैकी 9 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीचे 7 उमेदवार जिंकले. एका जागेवर अपक्षानं झेंडा फडकवला आणि भाजपच्या वाट्याला एकही जागा आली नाही. प्रचाराच्या काळात गोपीचंद पडळकरांनी जोरदार वातावरणनिर्मिती तयार केली होती. अनेक जाणकार पडळकरांच्या करिश्म्याचंही भाकीत वर्तवू लागले होते. नगरपंचायतीच्या प्रचाराला बडे नेते आणू, असाही दावा करुन पडळकरांनी विरोधकांना सत्तेपासून दूर करण्याचा विश्वास उमेदवारांना दिला होता.
सर्व उमेदवारांना मिळून फक्त 105 मतं!
मात्र निकालात पडळकरांनी उभ्या केलेल्या सर्व उमेदवारांना मिळून फक्त 105 मतं मिळाली. तब्बल 9 प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांना मतांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. फक्त 6 आणि 11 या दोनच प्रभागांमध्ये भाजप उमदेवारांना मतांचा दुहेरी आकडा गाठता आला. त्यामुळे खानापुरात पडळकर शुन्यावर बाद आणि भाजप 105 वर ऑलआऊट अशीही चर्चा सांगलीत होऊ लागलीय.
रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
खानापूरमध्ये भाजपचा भोपळाही फुटला नाही. त्यावर बोलताना रोहित पवार यांनी पडळकरांना जोरदार टोला लगावलाय. भाजपनं काही कुटुंबावर बोलण्यासाठीच त्यांना विधान परिषदेचं सदस्यत्व दिलंय. कारण, मोठे नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकत नाहीत. त्यांचं काम फक्त बोलण्याचंच आहे, त्यांना दुसरं काय येतं, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केलीय.
खानापूर याआधी ग्रामपंचायत होती. नगरपंचायत झाल्यापासूनची ही दुसरी निवडणूक ठरली. राज्यपातळीवर गोपीचंद पडळकर आक्रमकपणे बोलत असले, तरी स्थानिक निवडणुकांमध्ये प्रवेश करणं तितकं सोपं नाही, हे या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झालंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध मुद्द्यांवर बोलणाऱ्या पडळकरांचा स्वतःच्याच होमग्राऊंडवर झालेल्या पराभव चर्चेत आहे.
इतर बातम्या :