सिंधुदुर्गातल्या विजयानंतर नारायण राणेंची डरकाळी, ठाकरे सरकारला दिलं थेट आव्हन
भाजपचा मुख्यमंत्री होणार असा दावा करताना राणेंनी लगानची टीम नको असं म्हटलंय. लगान चित्रपटात इंग्रजांविरोधात क्रिकेट टीम तयार करताना, आमीर खाननं गावातले 11 जण गोळा केले होते. त्याचप्रमाणं राणेंनी 3 पक्षांच्या महाविकास आघाडीला राणेंनी अप्रत्यक्षपणे लगानची टीम म्हटलंय.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत, भाजपनं महाविकास आघाडीवर 11-8 नं विजय मिळवला आणि इकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबईतून सिंधुदुर्गात थेट हेलिकॉप्टरनं आले. राणेंच्या समर्थकांनी स्वागताची तयारी केली होतीच. त्यामुळं हेलिकॉप्टरमधून उरताच समर्थकांनी राणेंचं स्वागत केलं. त्यानंतर सिंधुदुर्गातल्या निवासस्थानी येऊन राणेंनी, आपलं पुढचं लक्ष्य जाहीर करत, महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आणि उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
आम्हाला लगानची टीम नको
भाजपचा मुख्यमंत्री होणार असा दावा करताना राणेंनी लगानची टीम नको असं म्हटलंय. लगान चित्रपटात इंग्रजांविरोधात क्रिकेट टीम तयार करताना, आमीर खाननं गावातले 11 जण गोळा केले होते. त्याचप्रमाणं राणेंनी 3 पक्षांच्या महाविकास आघाडीला राणेंनी अप्रत्यक्षपणे लगानची टीम म्हटलंय.
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला पुन्हा फेल
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही लक्ष घातलं होतं. संस्था, बँका उभ्या करायला अक्कल लागते असं म्हणत त्यांनी राणेंना टार्गेट केलं होतं. त्याचाही समाचार राणेंनी घेतलाय. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत, बँकेचे अध्यक्ष सतीश सावंतांचाच पराभव झाला. मात्र जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती जिंकली असा आरोप सावंतांनी केला. त्यामुळं राणेंनी सावंतांवरही पलटवार केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून विजय सुरु झाला, असं राणे म्हणतायत. त्यामुळं शिवसेनेला राणेंनी आणखी आव्हान देणं सुरु केलंय. कोकणातलं राजकारण म्हटलं की, राणे विरुद्ध शिवसेना असंच चित्र आजवर राहिलंय. मग ते साधी नगर पंचायत, जिल्हा परिषद किंवा जिल्हा बँकेची निवडणूक का असेना एकमेकांवर वरचढ होण्याची संधी ना राणे कुटंब सोडतं, ना शिवसेना, त्यात आता जिल्हा बँकेत राणेंनी सरशी मिळवलीय. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.