Corona Third Wave | नव्या वर्षाच्या पहिल्याच तारखेनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धडकी भरवली, कारण…
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोनाची रुग्णसंख्येचा विस्फोट होण्यास सुरुवात झालीय. 31 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, देशात 22 हजार 775 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यापैकी महाराष्ट्रातच 8067 रुग्ण आहेत.
थर्टी फर्स्ट संपला. नव्या वर्षाला सुरुवात झाली. आणि पुन्हा एकदा पहिल्याच तारखेला, कोरोनानं धडकी भरवण्यास सुरुवात केली. कारण महाराष्ट्रात 500च्या आलेली रुग्ण संख्या झपाट्यानं वाढलीय. कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रुग्ण संख्येचा वेग अधिक असल्याचं दिसून आलंय. नव्या वर्षाला सुरुवात होताच, पुन्हा चिंता वाढण्यास सुरुवात झालीय. कारण गेल्या 5 दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट झालीय. त्यातच देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णसंख्याही महाराष्ट्रातच आहे.
आकड्यांचे अंदाज
28 डिसेंबरला राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी मुंबईत 1233 रुग्ण आढळले. 29 डिसेंबरला राज्याचा आकडा वाढला, 3900 नवे रुग्ण आढळले. तर मुंबईत 2510 नव्या रुग्णांची नोंद झाली. 30 डिसेंबरला महाराष्ट्रात कोरोनाचे 5368 रुग्ण वाढले. त्यापैकी मुंबईतच 3928 रुग्ण होते. पुन्हा 31 डिसेंबरला रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला. थर्टी फर्स्टला राज्यातली रुग्णांची संख्या 8067 इतकी झाली. त्यापैकी एकट्या मुंबईतच 5428 नवे रुग्ण आढळले. त्यामुळंच मुंबईतील बंद केलेले कोव्हिड सेंटर सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोविड सेंटर सुरु करण्यासोबतत लहान मुलांसाठीचं लसीकरणासाठीही सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे.
तिसऱ्या लाटेची चाहूल
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोनाची रुग्णसंख्येचा विस्फोट होण्यास सुरुवात झालीय. 31 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, देशात 22 हजार 775 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यापैकी महाराष्ट्रातच 8067 रुग्ण आहेत. म्हणजेच देशाच्या तुलनेत 35 % नवे बाधित रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचं, राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणंय.
राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी रुग्णवाढीवरुन चिंता व्यक्त केली आहे. वाढती रुग्णसंख्या ही ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाचे संकेत आहेत की खरंच समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे, याबाबत आयीएमआर स्पष्टपणे काय ते सांगेल. पण तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता नाकारता येऊच शकत नाही, असंही त्यांनी नमूद केलंय.
महाराष्ट्रात पाचच दिवसांत कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढला. त्यात ओमिक्रॉनची अधिक भीती आहे. मुंबईत 21 आणि 22 डिसेंबरला 282 मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने कस्तुरबातील प्रयोगशाळेत जनुकीय चाचणीसाठी पाठवले होते. त्यात 282 पैकी 156 रुग्णांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं समोर आलंय म्हणजेच ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक आहे, हे स्पष्ट झालंय.
भीती आणि चिंता!
ओमिक्रॉनमुळंच तिसरी लाट येईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. टास्क फोर्सच्या सदस्यांनी तर देशात तिसरी लाट सुरु झाली, असा अंदाजही व्यक्त केलाय. मात्र ओमिक्रॉन जेवढ्या झपाट्यानं वाढतोय, तितक्याच वेगानं तो खाली येईल, आणि त्यामुळं ओमिक्रॉनमुळं तिसरी लाट येणार नाही, असा दावा डॉ. रवी गोडसेंनी केला होता.
तिसऱ्या लाटेबद्दल मतंमतांतर असली, तरी कोरोनाचे नियम पाळणं आणि गर्दी टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. मग ती मंदिरांमध्ये नव्या वर्षाच्या निमित्तानं दर्शनासाठीची गर्दी असो..की राजकीय कार्यक्रमांमधली..! उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत्या प्रचाराचा जोर आहे. मात्र इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्याच रोड शो मध्ये तुफान गर्दी झाली. कोरोनाच्या नियमांचे अक्षरश: तीनतेरा वाजले. काही दिवसांत आता देशातल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळं देशातच कोरोनाचा वाढणारा संसर्ग पाहता राजकीय कार्यक्रमांसोबत इतर ठिकाणी होणारी नकोशी गर्दी न परवडणारी आहे, हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याची गरज निर्माण झाली आहे.