पंकजा मुंडेंचा दिल्ली दौरा पक्ष बैठकीसाठी की नाराजी कानावर घालण्यासाठी? वाचा 5 मोठे मुद्दे
हा फक्त पक्षाचा निर्णय म्हणून कुणी तो आंधळेपणानं स्वीकारायला तयार नाहीत हेच राजीनामा सत्रावरून दिसतं आहे. त्यामुळेच भाजपात पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्याचा डाव असल्याचं जे सामनात लिहिलंय ते पंकजा समर्थकांना पटतंय अशीही एक भावना दिसून येतेय
मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात प्रीतम मुंडेंना डावललं गेल्याचा आरोप राज्यात होतोय. पंकजा मुंडे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण काहीही झालं तरी त्यांची नाराजी लपून राहीलेली नाही. त्यानंतर बीड, परभणी, नगर अशा जिल्ह्यांमध्ये सुरु झालेलं पंकजा समर्थकांचं नाराजीसत्रानं भाजपसमोर अभूतपुर्व संकट उभं केलंय. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली हायकमांडनं पंकजा मुंडेंना बोलावलय. त्या दिल्लीला रवानाही झाल्यात. कशी असेल ही भेट?
1. पक्षाच्या कामाचा दौरा अशी माहिती मिळतेय की, पंकजा मुंडेंचा हा दिल्ली दौरा हा संघटनेच्या कामाचा भाग आहे. पंकजा मुंडे ह्या राष्ट्रीय सचिव आहे. मध्यप्रदेश भाजपाच्या त्या सहप्रभारी आहेत. त्याच कामाचा भाग म्हणून त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं आहे. याच कामाच्या काळात पंकजा मुंडेंचं जेपी नड्डांशी बोलणं होऊ शकतं. पण ते प्रीतम मुंडे किंवा मंत्रीमंडळ विस्ताराबाबतच असेल असं नाही अशी शक्यताही वर्तवण्यात येतेय.
2. स्वतंत्र भेटीची शक्यता नाही? प्रीतम मुंडे यांना न मिळालेलं मंत्रीपद, त्यावरून सुरु झालेली दोन्ही भगिनींची नाराजी या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दिल्लीत आहेत. पण या दौऱ्यात पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची वन टू वन भेट होईल अशी शक्यता नसल्याची माहिती दिल्लीतल्या सूत्रांनी दिलीय. दोघांची भेट झाली तर संघटन बैठकीच्या दरम्यानच होऊ शकते असही सांगितलं जातंय.
3. भाजपा म्हणजे काँग्रेस नाही दोन तीन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्ली गाठली. सोनियांची नेत्यांनी भेट घेतल्याचं सांगितलं गेलं. राऊत आणि पटोले यांच्यात वाद आहे. तो वाद सोनियांच्यासमोर गेला. पण हे काँग्रेसमध्येच होऊ शकतं असं जाणकारांना वाटतं. भाजपात ही प्रथा नाही. नेत्यांच्या साध्यासुध्या नाराजीची भाजपात दखल घेतली जात नसल्याचं दिल्लीतले जाणकार सांगतात. त्यामुळे उगीच त्या नेत्याला महत्व येऊ देत नाहीत असं भाजपचं राजकारण आहे. पंकजा मुंडेंची नाराजी असेल तरीही त्यासाठी नड्डा भेट देतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.
4. आणि भेट झालीच तर पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची संघटनेच्या बैठकीत भेट झाली तर पंकजा मुंडे स्वत:ची नाराजी व्यक्त करतील अशीही एक शक्यता वर्तवली जातेय. प्रश्न फक्त पंकजांच्या नाराजीचा असता तर एक वेळेस ती गृहीत धरुन वेळकाढूपणा चालला असता. पण कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे राजीनामे सुरु झालेत. त्याची हाणी पक्षाला बसू शकते. त्यामुळे नड्डांशी पंकजांचं बोलणं होईल अशी शक्यताही नाकारता येत नाही. 5. प्रीतम मुंडेंना का डावललं? प्रेस कॉन्फरन्समध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रीतम हुशार आहे, कष्टाळू आहेत, त्या काम करतात, त्या मंत्रिपदाला लायक आहेत. पंकजांच्या बोलण्याला अनेकांचं समर्थन आहे. पण असं असतानाही प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना संधी का? ह्या प्रश्नाचं उत्तर भाजपातले निर्णय घेणारी मंडळी देऊ शकलेले नाहीत. हा फक्त पक्षाचा निर्णय म्हणून कुणी तो आंधळेपणानं स्वीकारायला तयार नाहीत हेच राजीनामा सत्रावरून दिसतं आहे. त्यामुळेच भाजपात पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्याचा डाव असल्याचं जे सामनात लिहिलंय ते पंकजा समर्थकांना पटतंय अशीही एक भावना दिसून येतेय. त्याच संदर्भात पंकजा भाजपच्या हायकमांडच्या कानावर राज्यातल्या चार गोष्टी घालू शकतात असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय.