पंतप्रधान जागतिक दहशतवादी तर गृहमंत्र्याच्या डोक्यावर 5 मिलियन डॉलरचं बक्षिस, वाचा अफगाणिस्तानचे टॉप 6 मंत्री
तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा करण्यात आलीय. पण राज्यकारभार चालवणं हे सर्वात मोठं आव्हान असेल. एक तर आता पंतप्रधान, उपपंतप्रधान, गृहमंत्री हे सगळे अमेरीकेसह यूएनच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहेत. जग ह्या सरकारसोबत कसा कारभार करणार हे पहाणं औत्सुक्याचं असेल.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा करण्यात आलीय. ह्या सरकारची जगाला उत्सुकता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणून ज्या अखूंदची घोषणा केलीय तो संयुक्त राष्ट्राच्या यादीत जागतिक दहशतवादी आहे तर गृहमंत्री म्हणून ज्याला घोषीत केलंय, त्याच्या डोक्यावर अमेरीकेनं मोठं बक्षिस ठेवलेलं आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तानच्या टॉपच्या सहा नेत्यांबद्दल.
मुल्ला हसन अखूंद-पंतप्रधान (Mullah Hasan Akhund) मुल्ला हसन अखूंद हा तालिबानचा संस्थापकांपैकी एक आहे. तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. विशेष म्हणजे यूएनची दहशतवाद्यांची जी यादी आहे त्यात मुल्ला हसन अखूंद यांचं नाव आहे. अखूंद हे तालिबानचा जिथं जन्म झाला त्या कंदहारचेच आहेत. गेली वीस वर्ष ते तालिबानसाठी कार्यरत होते. अखूंद यांची ओळख ही मिलिटरी लीडर कमी आणि धार्मिक नेता म्हणून जास्त आहे. अखूंद हे फार खळबळपणे चर्चेत असणारे नेते नाहीत पण शांत रहावून तालिबानचं त्यांनी अखंडपणे काम केलं. त्यामुळेच ते पंतप्रधानपदी पोहोचल्याचं मानलं जातंय.
मुल्ला बरादर-उपपंतप्रधान (Mullah Baradar) मुल्ला अब्दूल गनी बरादर हा तालिबानच्या राजकीय विंगचा प्रमुख आहे. दोह्यात जी तालिबानसह आंतरराष्ट्रीय चर्चेच्या फेऱ्या झाल्यात त्यातही बरादरची महत्वाची भूमिका राहिलीय. मुल्ला ओमरसह तालिबानची स्थापना करण्याचं श्रेय हे बरादरकडे जातं. तालिबानची ज्यावेळेसही चर्चा होते, तेव्हा मुल्ला अब्दूल गनी बरादर (Mullha Abdul Ghani Baradar) चे नाव चर्चेत असतेच. बरादरचा जन्म आणि वाढ ही कंदहारची. याच कंदहारमध्ये तालिबानचाही जन्म झाला. 1970 ला सोव्हिएत यूनियननं अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली. त्या एका घटनेनं अफगाण लोकांच्या एका पिढीचं आयुष्य कायमचं बदललं. असं मानलं जातं की, त्या एका घटनेमुळे अफगाणिस्तानच्या प्रत्येक व्यक्तीवर कायमचा परिणाम झाला. त्यापैकीच एक आहे मुल्ला अब्दूल गनी बरादर. एका डोळ्यानं अधू असलेल्या मुल्ला ओमरसोबत खांद्याला खांदा लावून मुल्ला अब्दूल गनी बरादर लढल्याचं सांगितलं जातं. सोव्हिएत यूनियनं अफगाणिस्तानमधून माघार घेतली आणि यादवी माजली. त्याच अस्थिरता, गोंधळ, भ्रष्टाचाराच्या वातावरण मुल्ला ओमर आणि मुल्ला अब्दूल गनी बरादरनं तालिबानची स्थापना केली. 2010 साली मुल्ला अब्दूल गनी बरादरला पाकिस्तानच्या कराचीत अटक करण्यात आली होती आणि 2018 मध्ये त्याची सुटका केली गेली. तेही अमेरीकेच्या दबावानंतर.
अब्दूल सलाम हनाफी-उपपंतप्रधान (Abdul Salam Hanafi) अखूंद यांचे जे दोन डेप्युटी करण्यात आलेत त्यात अब्दूल सलाम हनाफीचा समावेश आहे. हनाफी हा उज्बेक आहे आणि ज्वाजान प्रांतातून येतो. हनाफीचीही ओळख धार्मिक नेता म्हणूनच आहे. वेगवेगळ्या मदरशांमध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे. कराचीतही हनाफीनं बरेच सेमिनरीजला हजेरी लावलेली आहे. विशेष म्हणजे हनाफीनं काबूल विद्यापीठात काही काळ शिकवण्याचही काम केलेलं आहे. तालिबानच्या सुरुवातीपासूनच हनाफी जोडला गेलेला आहे. हनाफीची ओळख आलीम ए दिन म्हणजे मौलवी अशी आहे. कतारमध्ये तालिबानची जी टीम अमेरीकेसोबत चर्चा करत होती, त्या टीमचा भाग हनाफी होते. तालिबानच्या आधीच्या सरकारमध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलीय.
अब्दूल खान मुताकी-परराष्ट्र मंत्री (Abdul Khan Muttaqi) कतारमध्ये तालिबानच्यावतीनं जो ग्रुप चर्चा करत होता, त्याच ग्रुपचा भाग होता अब्दूल खान मुताकी. त्यांनाच आता अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री घोषीत करण्यात आलंय. मुताकी पन्नाशीत आहे आणि नाद अली जिल्ह्यात त्यांचा जन्म झालाय. 15 ऑगस्टला तालिबाननं काबूलवर कब्जा केला. त्यानंतर तालिबानचे काही नेते काबूलला आले. त्यांनी तालिबानचा विरोध करणाऱ्या नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी हमीद करजाई, अब्दुल्ला अब्दुल्ला या नेत्यांसोबतही चर्चा सुरु केली. ती चर्चा अब्दूल खान मुताकीच्याच नेतृत्वात केली गेली. आताचं अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार आणण्याचे जे प्रयत्न झालेत. त्यात मुताकीची महत्वाची भूमिका आहे.
सिराजुद्दीन हक्कानी- जागतिक दहशतवादी ते थेट गृहमंत्री (Haqqani Network) अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री कोण असं जर कुणी विचारलं तर त्याचं आता उत्तर आहे सिराजुद्दीन हक्कानी. पण हक्कानीची एवढीच ओळख नाही. सिराजुद्दीन हक्कानी हा जलालुद्दीन हक्कानींचा मुलगा आहे जो वॉरलॉर्ड म्हणून ओळखला जातो. जलालुद्दीन हक्कानीनेच हक्कानी नेटवर्क उभं केलं, जे आधी सोव्हिएत यूनियनच्याविरोधात लढले आणि नंतर अमेरीकेच्या. त्यामुळे सिराजुद्दीन हक्कानी यूएनच्या लिस्टमध्ये जागतिक दहशतवादी म्हणून आहे. विशेष म्हणजे सिराजुद्दीन हक्कानीच्या डोक्यावर अमेरीकेनं 5 मिलियन डॉलरचं रिवॉर्ड ठेवलेलं आहे. FBI च्या वेबसाईटवर तशी माहितीही आहे. याचाच अर्थ असा की, अफगाणिस्तानच्या नव्या गृहमंत्र्याला जो कुणी पकडून देईल त्याला अमेरीका पाच मिलियन डॉलर देणार. अमेरीकेच्यादृष्टीनं सिराजुद्दीन हक्कानी फरार-गायब आहे. 2008 मध्ये काबूलच्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा जणांचा बळी गेला होता. त्यात काही अमेरीकनही होते. ते सिराजुद्दीन हक्कानीनेच घडवल्याचा आरोप आहे. त्याचवर्षी म्हणजे 2008 सालीच तत्कालीन अफगाण राष्ट्रपती हमीद करजाई यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता, तोही सिराजुद्दीन हक्कानीनेच घडवल्याचा ठपका आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेची ज्या व्यक्तीवर जबाबदारी आहे त्याची पार्श्वभूमी ही जागतिक दहशतवादाची आहे.
मोहम्मद याकूब-संरक्षण मंत्री (Mullah Yakoob) मोहम्मद याकूब हाच मुल्ला याकूब म्हणून ओळखला जातो. अफगाणिस्तानचा नवा संरक्षण मंत्री म्हणून त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. याकूब हा मुल्ला ओमरचा मुलगा आहे, ज्याच्यासाठी अमेरीकेनं जंग जंग पछाडलं होतं. मुल्ला ओमर हा तालिबानच्या संस्थापकांपैकी एक होता आणि ते कडवट होता. त्याचाच मुलगा याकूब हा मात्र तसा मॉडरेट म्हणून ओळखला जातो. त्याचं शिक्षण पाकिस्तानमध्ये झालं. त्याचे सौदीशी घनिष्ठ संबंध असल्याचं मानलं जातं. एवढच नाही तर अमेरीकेच्या पाठिंब्यावर जे सरकार अफगाणिस्तानमध्ये होतं, त्याच्याशीही याकूबचे संबंध होते. याकूब हा अफगाणिस्तानमधली युद्ध परिस्थिती संपून शांतता निर्माण व्हावी ह्या मताचा राहीला आहे. त्यामुळेच त्याला मॉडरेट मानलं जातं. 2016 मध्ये याकूबकडे तालिबानी लष्कराची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर तालिबानची जी टॉपची निर्णय घेणारी बॉडी आहे, रहबारी शुरा त्याच्यातही याकूबचा समावेश करण्यात आला.
तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा करण्यात आलीय. पण राज्यकारभार चालवणं हे सर्वात मोठं आव्हान असेल. एक तर आता पंतप्रधान, उपपंतप्रधान, गृहमंत्री हे सगळे अमेरीकेसह यूएनच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहेत. जग ह्या सरकारसोबत कसा कारभार करणार हे पहाणं औत्सुक्याचं असेल.
Breaking | अफगाणिस्तानात तालिबान सरकारची स्थापना, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी