Sambhaji Chhatrapati: संभाजी छत्रपतींच्या दोन ओळीनं उद्धव ठाकरे चेकमेट की एका राज्यसभा सीटसाठी संभाजी छत्रपतींकडून ‘घराणं’ पणाला?
Sambhaji Chhatrapati: ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजेंनी हे लक्षात घ्यावं. इथे कुठे छत्रपतींचा संबंध येतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिल्यानंतर या देशात लोकशाही सुरू झाली.
मुंबई: शिवसेनेने राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) शिवबंधन घालण्याची अट घातल्यानंतर स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी आता नवा डाव टाकला आहे. संभाजी छत्रपती यांनी या निवडणुकीत थेट घराणच पणाला लावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) छत्रपती घराण्याचा सन्मान राखतील असा मला विश्वास आहे, असं सांगून संभाजी छत्रपती यांनी शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. संभाजी राजेंनी छत्रपती घराण्याचं नाव पुढे करून शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेला चेकमेट दिला की एका राज्यसभेसाठी घराणंपणाला लावलं याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजेंनी घराण्याचा दाखला का दिला? त्यामागे त्यांची काय राजकीय खेळी आहे? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. तर, संभाजीराजेंच्या या खेळीमुळे शिवसेनेला भविष्यात त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
इथे कुठे ‘छत्रपतीं’चा संबंध येतो?
संभाजी छत्रपती यांनी नवा राजकीय डाव टाकला असून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजेंनी हे लक्षात घ्यावं. इथे कुठे छत्रपतींचा संबंध येतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिल्यानंतर या देशात लोकशाही सुरू झाली. त्यानंतर राजघराण्याचा संबंध येण्याचं कारण नाही. वारसदार हा वैचारिकही असू शकतो. छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे आणि आदर असलाच पाहिजे. पण राजकीय हितासाठी वारश्याला पुढे आणून राजकारण कॅश करणं याचा अर्थ त्यांना लोकशाहीचं नीट भान आलं नाही असं वाटतंय. त्यांचं राजकारण साधण्यासाठी त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. बरं की वाईट हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. ही लोकशाही आहे. राजघराण्याचा आदर ठेवून त्यांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी सांगितलं.
राजे शिवबंधन घालण्यास संकोच का करतात?
शिवसेनेचे महाराष्ट्र हितवादी राजकारण आणि समाजकारण यापेक्षा छत्रपतींचा अधिक मोठा सन्मान कोणता असू शकतो? तरीही शिवसेनेकडून छत्रपतींच्या घराण्याच्या सन्मानाची अपेक्षा व्यक्त करणारे संभाजीराजे हाती शिवबंधन बांधण्यास संकोच का करतात? केवळ शिवसेनेच्या हक्काच्या राज्यसभेच्या जागेवर आपली उमेदवारी लादण्यासाठी छत्रपतींच्या सन्मानाची जबाबदारी एकट्या शिवसेनेवर ढकलण्याचा प्रकार म्हणजे राजकीय ब्लॅक मेलिंगच म्हणावे लागेल, असं मत ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी व्यक्त केलं आहे.
घराणं आणणं चूकच
संभाजीराजेंचं घराणं आहे. त्यांच्यामागे मराठा समाज आहे. राज्यातील मराठा समाजाचं जे राजकारण सुरू आहे, त्यात मराठा लॉबी महाराष्ट्रात प्रभावी आहे. समाजात काम करण्याचं काम त्यांनी केलं आहे. संभाजीराजे भाजपचे उमेदवार असते तर त्यांना शिवसेनेकडे येण्याची गरज नव्हती. त्यांना राज्यसभा मेंटेन करायचं असेल तर आघाडीशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही, असं राजकीय पत्रकार सुनील जावडेकर यांनी सांगितलं. संभाजी राजेंनी राज्यसभेत घराणं आणायला नको होतं. ती त्यांची चूक आहे. तसं करायला नको होतो, असं सांगतानाच घराणं आणून शिवसेनेला कोंडीत पकडण्यात येत आहे, असंही जावडेकर यांनी सांगितलं. आता शिवसेना नेते संजय राऊतांच्या प्रतिक्रियांमध्ये फरक पडत आहे. आम्हीही सन्मान राखू. जी तडजोड सेनेला अपेक्षित होती ती झाली. संभाजीराजेंमध्ये जी तडजोड हवी होती ती झाली. फक्त संभाजीराजेंनी 100 टक्के पक्षात यावं हे साध्य झालं नाही. पण काही ना काही तडजोड झाली आहे हे नक्कीच, असंही त्यांनी सांगितलं.
संभाजीराजे राजकारण करताहेत
शिवसेनेने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजेंना पाठिंबा देणार नाही हे सेनेने स्पष्ट केलं आहे. आमच्या पक्षात आले शिवबंधन बांधले तरच उमेदवारी देणार असंही सेनेने स्पष्ट केलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेसाठी शिवाजी महाराज महत्त्वाचे आहेत. त्यांच्या वंशजांशी त्यांना काही घेणं देणं नाही, असं राजकीय पत्रकार राजकुमार सिंह यांनी सांगितलं.
अनेक लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानतात. सर्वच पक्षात बाळासाहेबांना मानणारे लोक आहेत. पण म्हणून ते शिवसैनिक ठरत नाहीत. त्यामुळे मराठा संघटना नाराज होण्याची शक्यता नाही. खासदार होण्यासाठी घराण्याला का आणता? शिवसेना राजकारण करत आहे, तर संभाजीराजेही राजकारण करत आहेत. ते घराणेशाही पुढे आणत आहेत. मी अमूक घराण्यातील आहे म्हणून मला राज्यसभेत पाठवा म्हणणं योग्य नाही, असंही राजकुमार सिंह यांनी स्पष्ट केलं.