Sambhaji Chhatrapati : संभाजी छत्रपती यांचा राज्यसभेसाठी मुख्यमंत्र्यासमोर नवा प्रस्ताव?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची रिॲक्शन काय?
Sambhaji Chhatrapati : संभाजी छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली.
मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी राज्यसभेसाठी (rajyasabha election) अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचं राज्यसभेवर जाणं कठिण होताना दिसत आहे. राष्ट्रवादी वगळता संभाजी छत्रपती यांना कुणीच जाहीरपणे पाठिंबा दिला नाही. भाजपने सर्व निर्णय केंद्रीय स्तरावर होत असल्याचं सांगून संभाजी छत्रपती यांना पाठिंबा देण्यावरून सस्पेन्स कायम ठेवला आहे. तर शिवसेनेने संभाजी छत्रपती यांना थेट पक्षात येण्याचीच अट घातली आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांच्या मार्ग अधिकच कठिण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली होती. मात्र, या भेटीतून फारसं काहीच निष्पन्न झालं नसल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीही संभाजीराजेंसमोर शिवसेना प्रवेशाची अट ठेवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नव्याने संघटना स्थापन केलेल्या संभाजीराजेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
संभाजी छत्रपतींचा नवा प्रस्ताव काय?
संभाजी छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी संभाजी छत्रपती यांनी उद्धव ठाकरेंपुढे नवा प्रस्ताव ठेवला आहे. आपल्याला शिवसेनेपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे अटींवर ठाम
संभाजी छत्रपती यांनी शिवसेनेऐवजी महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवसेनेत प्रवेश केल्यावरच राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंसमोर स्पष्ट केल्याचं सांगितलं जातं.
भाजपनेही हात झटकले?
मागच्यावेळी भाजपने संभाजी छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवले होते. मात्र, यावेळी भाजपने हात झटकल्याचं दिसून येत आहे. राज्यसभेच्या उमेदवाराचा निर्णय राज्यपातळीवर होत नाही. केंद्रीय स्तरावरच हा निर्णय होतो, असं सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे. त्यामुळे भाजपही संभाजीराजेंना पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे संकेत मिळत आहेत.