MIMला विरोध, पण शिवसेनेची मुस्लिम लीगसह सेक्युलर पक्षांशीही अनेकदा युती, इतिहास काय सांगतो?
औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत या आघाडीला विरोध केला आहे.
मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) येण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगत या आघाडीला विरोध केला आहे. शिवसेना आज एमआयएमशी आघाडी करण्यास भलेही नकार देत असलं तरी इतिहासाची पानं धुंडाळल्यास शिवसेनेने मुस्लिम लीगशीही युती केल्याचं आढळून येतं. इतकंच काय शिवसेनेने सेक्युलर पक्षांशी एक दोन नव्हे तर अनेक वेळा युती/आघाडी केल्याचंही दिसून येत आहे. मात्र, सध्याचं बदलतं वातावरण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळेच शिवसेना एमआयएमसोबत आघाडी करण्यास नकार देत असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.
मुस्लिम लीगशी आघाडी कधी?
शिवसेनेने अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे 1972-73 मध्ये मुस्लिम लीगशी युती करून मुंबई महापालिकेत महापौर बसवला होता. 1972-73मध्ये शिवसेनेने रा. सू. गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षासोबत युती केली होती. या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूकही लढवली होती. मात्र, महापौर बनविण्यासाठी काही जागा कमी पडत असल्याने शिवसेनेने मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला होता. त्यामुळे शिवसेना नेते सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर झाले होते. त्यानंतर 1979मध्ये शिवसेना नेते आणि मुस्लिम लीगचे नेते एका मंचावरही आले होते. नागपाड्यातील मस्तान तलाव येथील सभेच्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे नेते एकत्रं आले होते. मात्र, ही युती दीर्घकाळ टीकू शकली नाही. ती केवळ मुंबईचा महापौर बनविण्यापूरतीच मर्यादित होती. तसेच रिपाइंसोबतही नंतर शिवसेनेचा जास्त काळ घरोबा राहू शकला नाही.
अजून कुणाकुणाबरोबर युती?
शिवसेनेने 1972मध्ये रिपाइं सोबत, 1976-78मध्ये काँग्रेससोबत युती केली होती. मधल्या काळात शिवसेनेने नामदेव ढसाळांच्या दलित पँथरसोबतही युती केली होती. नंतर भाजपसोबत तब्बल 20-22 वर्ष युती केली. भीमशक्ती-शिवशक्तीला एकत्रं आणण्यासाठी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाशीही युती केली होती. तानसेन ननावरे यांच्या पक्षासोबतही शिवसेनेचा घरोबा होता. 1968मध्ये मधू दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षासोबतही युती केली होती.
शिवसेना आणि भूमिका
शिवसेनेच्या राजकीय भूमिकाही नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. शिवसेनेने आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. भाजपसोबत युती असतानाही राष्ट्रपतीपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनाही शिवसेनेने पाठिंबा दिला होता. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना श्रीवर्धन मतदारसंघात पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिका त्या त्या वेळेस चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
आता आघाडीला विरोध का?
शिवसेनेची सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही सेक्युलर पक्षांसोबत शिवसेनेने युती केल्याने शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची भाजपकडून टीका होत आहे. अशावेळी एमआयएमसोबत आघाडी केल्यास शिवसेनेने हिंदुत्व सोडूनच दिल्याचा प्रचार अधिक होऊ शकतो. भाजप या गोष्टीचा बाऊ करू शकते. त्यामुळे हिंदू मतदार आपल्यापासून दुरावू शकतो म्हणूनच शिवसेनेने एमआयएमसोबत आघाडी करण्यास विरोध केला असावा, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.
संबंधित बातम्या: