St worker strike : एसटीच्या संपात उभी फूट, खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट
एकीकडे एसटी बंद आहे आणि दुसरीकडे संपाच्या निमित्तानं खासगी ट्रॅव्हल्सचे वाढलेले रेट सामान्यांना डोईजड होतायत.
मुंबई : एसट्या सुरु कधी होणार, या प्रश्नानं सारा महाराष्ट्र बुचकळ्यात पडलाय. कारण, एकीकडे एसटी बंद आहे आणि दुसरीकडे संपाच्या निमित्तानं खासगी ट्रॅव्हल्सचे वाढलेले रेट सामान्यांना डोईजड होतायत. मुंबईहून विदर्भाच्या दिशेनं जाणाऱ्या स्लीपर गाड्यांची संख्या 300 चे आसपास आहे. संपाआधी त्यांचं तिकीट हजार रुपये होतं, आणि संपानंतर 1500 झालंय. मुंबईहून नाशिक-धुळ्यासाठी एकूण 250 खासगी ट्रॅव्हल्स चालतात. संपाआधी त्यांचे दर होते 700 रुपये, सध्या 1200 रुपये द्यावे लागत आहेत. मुंबईहून औरंगाबादकडे एकूण 150 ट्रॅव्हल्स जातात. संपाआधी 500 तिकीट होतं, आता 800 झालंय. मुंबईहून कोल्हापूर-सांगलीकडे जाणाऱ्या एकूण 300 खासगी बस आहेत. याआधीचं तिकीट होतं 450, आणि सध्या 700 रुपये मुंबईहून नागपूरसाठी एकूण 200 खासगी बस आहेत. संपाआधी तिकीट होतं हजार रुपये, संपानंतर तोच दर 1500 वर गेला.
प्रवासी संख्येत मोठी घट संपाआधी एसटीतून रोज 65 लाख प्रवाशी प्रवास करत होते. माहितीनुसार खासगी गाड्यांमधून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या 35 ते 40 लाख आहे. मागणी-पुरवठ्याच्या तत्वावर दरवाढ मान्य केली, तरी खासगी गाड्यांनी अजून किती दिवस महाराष्ट्र धावणार हा प्रश्न आहे. संपामुळे अनेक भागात तर गुरं-डोरं कोंबतात तशी वाहतूक सुरु आहे. लोकांकडे एसटीशिवाय पर्याय नाही आणि खासगी गाड्यावाल्यांना भाडेवाढीची एसटी संपासारखी नामी संधी मिळणार नाही.
विलीनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांना पगारवाढ
तूर्तास सरकारनं एसटी सरकारमध्ये विलीनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिलीय. जर समितीनं विलीनीकरणाचा अहवाल दिला, तर तो आम्ही स्वीकारु, असंही सरकारनं म्हटलंय. मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणासाठी संपावर ठाम आहेत. आता एसटी विलीनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल यायला माहितीनुसार अजून 7 ते 8 आठवडे लागतील. त्यामुळे खरोखर महाराष्ट्रात अजून दीड महिने एसट्या धावणार नाहीत का? आणि जर समितीनं विलीनीकरणाविरोधात अहवाल दिला, तर मग पुढे काय होईल? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
संपाला कुणाचा पाठिंबा, कोणाची पिछेहाट?
ज्यांनी एसटी आंदोलनाचं नेतृत्व केलं, ते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सध्या एसटी संपाबाबत बोलण्यास नकार देतायत. खोत आणि पडळकरांनी पगारवाढीनंतर एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. मात्र सदावर्तेंच्या दाव्यानुसार भाजपचा आजही एसटी संपाला पाठिंबा आहे. महाराष्ट्रात लगीनसराई सुरु झालीय. काही ठिकाणी शाळा-कॉलेज सुरु झालंय. ग्रामीण महाराष्ट्रात जत्रा भरण्याचा काळ जवळ आला आहे. मात्र आगारांमध्ये एसट्या उभ्या आहेत. इतके दिवस चाललेला इतिहासातला हा पहिलाच एसटी संप आहे.
याआधी झालेले संप आणि कालावधी
1978 मध्ये दिवाळी बोनससाठी एसटीचा संप झाला. हा संप 6 दिवस चालला. 1989 मध्ये वेतनवाढीसाठी संप झाला. हा संप 4 दिवस चालला नंतर 2016 मध्ये सातव्या वेतन आयोगासाठी संप झाला. हा संपही 4 दिवस चालला. मात्र सध्या संप सुरु होऊन 36 दिवस झाले आहेत. पण तरीही संप मिटण्याचं चित्र नाहीये. 73 वर्षांपासून धावणाऱ्या एसटीनं महाराष्ट्राचा विश्वास कमावलाय. त्यामुळे संपामुळे एसटीपासून प्रवासी कधीच दुरावणार नाही. मात्र एसटीविना होणारे हाल वाढत जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लोकांमध्ये सहानुभूती आहे. पण संप खेचण्याच्या नादात संपाबाबतची सहानुभूती रोषात बदलू नये, याचाही संपकऱ्यांनी विचार करायला हवा.