tv9 Marathi Special : फडणवीसांच्या पाठिंब्यानंतरही पंकजा मुंडेंना डच्चू का? ही पाच कारणे नक्की वाचा
tv9 Marathi Special : पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून डावलण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्या राष्ट्रीय पातळीवर कार्यकरत आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. शिवाय त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा भाजप (bjp) नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना विधान परिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnvais) यांनी मोठं विधान केलं होतं. विधान परिषदेसाठी माझा पंकजा मुंडे यांना पाठिंबाच आहे. पंकजा मुंडे या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, असं सांगतानाच विधान परिषदेचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेतं, असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज भाजपने विधान परिषदेच्या पाचही जागांचे उमेदवार घोषित केले. त्यात पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे समर्थक राम शिंदे यांना विधान परिषद देण्यात आली आहे. पण पंकजा यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा मुंडे यांना डावलण्याचे विविध कारणेही सांगितली जात आहे. नेमकी ही काय कारणं आहेत, त्याचा घेतलेला आढावा.
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून डावलण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्या राष्ट्रीय पातळीवर कार्यकरत आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. शिवाय त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या राष्ट्रीय पातळीवर कार्यकरत असल्याने पुन्हा त्यांना राज्याच्या राजकारणात आणणं योग्य नसल्यामुळेच त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
स्पर्धा नकोय म्हणून
पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत. आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी बोलूनही दाखवलं आहे. त्या उत्कृष्ट वक्त्या आहेत. मास लीडर आहेत. शिवाय आक्रमक नेत्या आहेत. तसेच स्वयंभू नेत्याही आहेत. त्यामुळे त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार होऊ शकतात. तसेच स्पर्धक होऊ शकतात. त्यामुळेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा या राज्याच्या राजकारणात येणार नाहीत अशी खेळी खेळल्याचं या निमित्ताने सांगितलं जात आहे. एकाचवेळी राज्यात अनेक प्रतिस्पर्धी नको. त्यातही पंकजा मुंडेंसारख्या तुल्यबळ स्पर्धक नकोत, म्हणूनही त्यांना विधान परिषद नाकारली गेल्याचं बोललं जात आहे.
पुनर्वसनाचा धोका नको
पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत. पंकजा मुंडे यांचं राज्यात पुनर्वसन केल्यास पक्षात त्या स्ट्राँग नेत्या होतील. त्यामुळे पक्षाला त्याची डोकेदुखी होऊ शकते. पक्षापेक्षाही फडणवीसांना त्यांची डोकेदुखी अधिक वाढू शकते. त्यामुळेही त्यांच्या पुनर्वसनाचा धोका न पत्करण्याची खेळी भाजपने केल्याचं दिसतंय.
ओबीसींच्या नेत्या म्हणून उदयाची भीती
पंकजा मुंडे या ओबीसी समाजातून येतात. त्या अभ्यासू नेत्या आहेत. त्यांचा ओबीसींच्या प्रश्नांचा सामाजिक आणि तांत्रिक अभ्यास आहे. त्यांचं राज्यात पुनर्वसन केल्यास त्या ओबीसींचं राजकारण सुरू करतील. विधानपरिषदेत गेल्यावर त्यांना ओबीसींचं राजकारण करण्यास बळ मिळेल. त्यामुळे त्या ओबीसींच्या नेत्या म्हणून उदयास येऊ शकतात. त्यामुळे त्यांचं पक्षातील स्थान अधिक बळकट होईल. ते होऊ नये म्हणूनही पंकजा यांचे पंख छाटण्यात आल्याचं बोललं जात आहे.
विरोधी पक्षनेतेपदाची अडचण
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवलं असतं तर प्रवीण दरेकर यांचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आलं असतं. नियमाप्रमाणे ज्येष्ठ सदस्याला विरोधी पक्षनेतेपद द्यावं लागतं. शिवाय दरेकर हे शिवसेना, मनसे आणि आता भाजप असे पक्ष बदलत आले असते. पंकजा मुंडे या भाजपवासी आहेत. त्या विधान परिषदेत असताना मेरिटवर त्यांना डावलणं कठिण झालं असतं. शिवाय पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या झाल्या असत्या तर फडणवीसांसोबत त्यांची कायम तुलना झाली असती. विधान परिषद आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कामाची कायम तुलना केली गेली असती. त्यामुळेही त्यांना डावललं गेलं असं सूत्रांनी सांगितलं.
डच्चू दिला असं म्हणता येणार नाही
पंकजा मुंडे यांना डच्चू दिला या अर्थाने मी बघत नाही. राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजातील जे वरिष्ठ नेते होते.त्या लोकांना केंद्रात भाजपने संधी दिली आहे. विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस केलं. पंकजा यांनाही राष्ट्रीय सरचिटणीस केलं. राष्ट्रीय स्तरावर या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचं दिसतंय. भाजप हा मोठा पक्ष आहे. भाजपकडे असंख्य नेते आहेत. प्रत्येकाला परिषदेवर सामावून घेणं शक्य नाही. काही लोकांना केंद्रात पाठवून संघटनेची जबाबदारी द्यायची आणि येणाऱ्या काळात त्यांचं चांगल्या जागेत पुनर्वसन करायचं हे भाजपचं धोरण दिसतंय, असं राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी सांगितलं.
तावडेंकडे लोकसभेचा मतदारसंघ नाही. पंकजा यांची बहीण खासदार आहे. त्यामुळे लोकसभेत त्यांना निवडून देणं शक्य नाही. विधानपरिषदेत जागा कमी होत्या. पंकजा मुंडे यांना पहिल्याच टर्ममध्ये आमदार करून मंत्री करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना राज्यात थांबवण्यात काही अर्थ नव्हता. भविष्यात त्यांना राष्ट्रीय स्तरावर चांगल पद दिलं जाईल असं वाटतं. डच्चू दिला असं म्हणणार नाही, असंही भावसार म्हणाले.
चेकमेटचा खेळ सुरू
देवेंद्र फडणवीस यांना अजूनही भाजपमधील तुल्यबळ मास बॅकिंगची मंडळी आहेत, त्यांना पुढे येऊ नये असं वाटतं. त्यात पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार ही लोक आहेत. आपला स्पर्धक तयार होणार नाही याची काळजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच घेत आहेत. गेल्यावेळी प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत होते. त्यावेळी या पदासाठी भाजपमध्ये इच्छुक अनेक होते. पण पाटलांशी त्यांचं ट्युनिंग जमत होतं. म्हणून ते चालले. याचा अर्थ ते प्रदेशाध्यक्षही तुल्यबळ होऊ देत नाही. मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्याची फडणवीसांना अजूनही भीती आहे. त्यामुळे ते काळजी घेत असतात. त्यांच्या भावी पोस्टपर्यंत कुणी फिरू नये, याची खबरदारी घेतात. तर दुसरीकडे पंकजा मुंडे समर्थक राम शिंदे असो की भागवत कराड यांना संधी देत त्यांना मोठंही करतात. थोडक्यात हा चेकमेटचा खेळ सुरू आहे, असं राजकीय विश्लेषक सुनील जावडेकर यांनी सांगितलं.