Blog : न्याय, आदर देऊनच म्हणा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !

आजचा हा दिवस साजरा करताना मनात असंख्य प्रश्नांची गुंतागुंत आहे. बातम्यांच्या विश्वात वावरताना अनेक दुर्दैवी घटनांचंही वृत्तांकन करावं लागतं. काही घटना चीड आणतात.

Blog : न्याय, आदर देऊनच म्हणा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !
world women's dayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 3:38 PM

वृषाली सारंग यादव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर आज जागतिक महिला दिन साजरा होतोय. आजच्या दिवसाचं महत्त्व समजावून सांगितलं जातंय. महिलांच्या कर्तृत्वाचा आढावाही घेतला जातोय. त्यांचं कौतुकही केलं जातंय. महिलांना मान सन्मान देण्याची भाषणबाजीही केली जातेय. अन् महिला हीच जगाची उद्धारी… असे गौरवोद्गारही काढले जात आहेत. असं असलं तरी महिलांना खरोखरच आज मानसन्मान दिला जातोय का? मानसन्मान, प्रतिष्ठा हे शब्द केवळ भाषणापुरते मर्यादित आहेत का? की पुस्तकात वाचण्यापुरते मर्यादित आहेत? वास्तव नेमकं काय आहे? स्त्रियांना आजही भोग वस्तू समजलं जातंय का? स्त्रियांची आजही अवहेलना होतेय का? यासह अशा अनेक प्रश्नांनाच धांडोळा घेतलाय, पत्रकार वृषाली सारंग यादव यांनी. वृषाली यादव सारंग यांचा हा लेख त्यांच्याच शब्दात….

नमस्कार,

मी वृषाली यादव सारंग… माझ्या सर्व मैत्रिणींना, महिला वर्गाला 111 व्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. 8 मार्च महिला दिन दरवर्षी आपण साजरा करतो. सोशल मीडियावर आपण शुभेच्छा देतो, आपल्यावर शुभेच्छांचा वर्षावही होतो. घरातली पुरुष मंडळी आठवणीने शुभेच्छा देतात आणि आपल्यासाठी असलेल्या दिवसाचं सेलिब्रेशन आपण त्यांना फर्स्ट क्लास चहा, नाष्टा देऊन साजरा करायला सुरुवात करतो.

हे सुद्धा वाचा

आपल्यापैकी अनेकींना या दिवसाचं महत्त्व माहीत असेलच. या दिवसाचं महत्त्व काय? हीच तारीख का? तर याचं मूळ आहे ते सातासमुद्रापार असलेलं न्यूयॉर्क. ज्याठिकाणी 1908 मध्ये हजारोंच्या संख्येनं महिला रस्त्यावर उतरल्या आपल्या हक्कासाठी, न्याय मिळावा यासाठी. कामाचे कमी तास, योग्य मोबदला म्हणजेच चांगला पगार, मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून महिलांनी एकजूट दाखवली. ती यशस्वीही करुन दाखवली आणि समस्त महिला वर्गाला हा दिवस साजरा करण्याची सुवर्ण संधी मिळाली.

या दिवसाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे आजच्या दिवशी जांभळ्या रंगाचं औचित्य आहे. जांभळा रंग म्हणजे न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतिक. या दोन शब्दांमध्ये बाईचं विश्वच सामावलेलं आहे. आज 111 वर्षानंतर भारतासारख्या देशात हा दिवस साजरा होत असताना वरवरचा आनंद न पाहता तिच्या अस्तित्वाचा खरंच विचार होतोय का? हा आभाळाएवढा मोठा प्रश्न साहजिकच पडल्यावाचून राहत नाही. मुलींचा, महिलांचा सन्मान करा, तिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहू नका, ती उपभोगाची वस्तू नाही. ती आई, माई, ताई, अक्का आहे. तिच्यावर अत्याचार होऊ देऊ नका, अत्याचार करु नका, हे बोलून बोलून शब्द बोथट झालेत.

तिला काय हवंय? जसं जसं भ्रमंती करताना भौगोलिकदृष्ट्या हवा, पाणी, वारा बदलतो तशाच जगाच्या कानाकोपऱ्यातल्या तिच्या समस्याही अनेक आहेतच. पण नाशिकपासून न्यूयॉर्कपर्यंत तिच्यातला समान धागा म्हणजे तिला हवाय न्याय आणि प्रतिष्ठा. न्याय हवाय तो सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि आरोग्याच्यादृष्टीनेही. ती आरोग्यसंपन्न राहिली तर कुटुंब उभं राहू शकतं. मात्र तिच्या आरोग्याची हेळसांड झाली तर कुटुंबाचा डोलारा ढासळायला वेळ लागत नाही.

तिच्यासाठी सक्षम आरोग्ययंत्रणा आजही उभी राहिलेली नाही ही शोकांतिकाच आहे. जो महिला वर्ग सुशिक्षित आहे, चार पैसे गाठोड्याला बांधून आहे, त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घेणं तितकंस अवघड नाही. मात्र श्रमिक, अल्प उत्पन्न गटातल्या महिलांचं काय? जिल्हा आरोग्य केंद्र, महापालिका रुग्णालयच त्यांचा आधार आहेत. पण, याठिकाणची यंत्रणा तिच्यासाठी किती तत्पर आहेत याचा अभ्यास आपल्या सरकारने, यंत्रणेने आणि आपल्या महिला नेत्यांनी करण्याची नितांत गरज आहे.

ठाण्यातल्या कळवा रुग्णालयाच्या नव्या लेबर वॉर्डच्या उद्घाटनासाठी आपले मुख्यमंत्री गेले होते. साग्रसंगीत सरकारी कार्यक्रम सुरु असताना रुग्णांच्या नातेवाईकांनी सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. आणि लगेचच संध्याकाळी रुग्णालयाचे डीन डॉ. योगेश शर्मा आणि डेप्युटी डीन डॉ. सुचितकुमार कामखेडकर या दोघांचे निलंबन झालं. ही जरब हवीच. तेव्हाच सामान्यांना न्याय मिळेल. मुख्यमंत्र्यांचं या निर्णयाबाबत कौतुकच. मात्र ही तत्परता आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असायला हवी. मुंबई, ठाण्यासारख्या शहरी भागात काही अंशी सुविधा पाहायला मिळतात मात्र ग्रामीण भागाचं काय?

पश्चिम महाराष्ट्र हा जसा महाराष्ट्राला मिळालेल्या सर्वाधिक मुख्यमंत्र्यांचा भाग म्हणून ओळखला जातो तसाच तो रसाळ ऊसासाठीही ओळखला जातो. या गोड ऊसातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी जितकी मेहनत साखर कारखानदार घेतात, तितकी त्यांच्या मळ्यात राबणाऱ्या श्रमिकांच्या आरोग्यासाठी घेताना दिसत नाहीत. मजुराचं एक अख्खं कुटुंब राबतं. मात्र त्या कुटुंबातल्या महिलेच्या होणाऱ्या हेळसांडीकडे सपशेल दुर्लक्षच होतं. नुकतंच कोल्हापूरमध्ये एक ऊसतोड कुटुंब निपाणीकडून गोरगोटीच्या दिशेनं जात होतं. मात्र खराब रस्त्यामुळे महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या आणि तिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला. आणि खुरप्यानेच बाळाची नाळ कापण्याची वेळ आली. दोघंही सुखरुप आहेत हे सुदैव. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनीही याची दखल घेतली. अशा घटना पुन्हा होऊ नयेत आणि रस्ते प्रवास सुकर व्हावा यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेला निर्देश दिल्याचं ट्विट केलं.

अशा असंख्य घटना दिवसागणिक घडत असतील. सरकारी रुग्णालयांवर खर्च होतोय. बजेटमधले आकडे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोळे पांढरे कढणाऱ्या आकड्यांची घोषणा हे सर्व काही नित्यनेमाचंच झालंय. मात्र सोयीसुविधांचा हिशोब कुणी देणार का? किंबहुना कुणी मागणार का? आरोग्य यंत्रणा सक्षम करुन महिलांना वैद्यकीयदृष्ट्या न्याय देणं ही सरकारचीच जबाबदारी. प्रत्येक ठिकाणी यंत्रणा पोहचू शकत नाही हे मान्य. मात्र किमान त्या यंत्रणेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणं ही सुद्धा यंत्रणेचीच जबाबदारी. आज अनेक संस्था, सरकारी योजनांमधून आरोग्य शिबिरांचं आयोजन करतात. मोफत उपचार होतात. मात्र या शिबिरांचं लोकेशन कोणतं असावं याचाही सविस्तर अभ्यास हवा.

आजचा हा दिवस साजरा करताना मनात असंख्य प्रश्नांची गुंतागुंत आहे. बातम्यांच्या विश्वात वावरताना अनेक दुर्दैवी घटनांचंही वृत्तांकन करावं लागतं. काही घटना चीड आणतात. काही घटना या महिलेनं आपलं कर्तृत्व सिद्ध करुनही तिच्याकडे बाई म्हणूनच पाहिलं जातं, अशा घडतात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. तिच्य़ा प्रतिष्ठेचा विचार होत नाही. बाई म्हणून तिच्याकडे पाहिल्या जाणाऱ्या नजरांची किळस वाटते.

नुकताच गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. गौतमीने कुठलाही आकांडतांडव न करता तिचे नियोजित कार्यक्रम पूर्ण केले. स्टेजवर अगदी आत्मविश्वासाने गौतमीला पाहिल्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं असेल असं कुणालाही वाटलं नाही. तिने रितसर पोलिसात तक्रार दिली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनीही याची दखल घेतली. या अश्लील प्रकारानंतर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंनीही आवाहन केलं की, मायबाप रसिक प्रेक्षकांनी तिच्याकडे कलाकार म्हणून पाहावं. मंगला बनसोडे या एकमेव कलाकार ज्या गौतमीसोबत उभ्या राहिल्या.

गौतमीचं काम, तिची कला, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचाच वेगळा. तिच्या डान्सवर इतर कलाकारांनी घेतलेले आक्षेप हे योग्यच. मात्र त्यानंतर व्हिडिओ जारी करत खांद्यावरच्या पदराला पीन लावेन, अंगावार पाणी टाकणार नाही हे जाहीररित्या सांगणारी गौतमी एकमेवच असावी. कुणी तिच्याकडे तमासगीर म्हणून पाहतं तर कुणी कलाकार म्हणून तिला कार्यक्रमाची सुपारी देतं. तिच्या कार्यक्रमांना होणारी तुफान अधिक राडा करणारी गर्दी पाहता… यात फक्त कला शौकीनच नाही तर आंबट शौकीनही आहेत, हे काही वेगळं सांगायला नको.

तिला मिळणारी प्रसिद्धी, तिचा ग्लॅमरस अंदाज, स्टेजवरचा तिचा आत्मविश्वास हे सगळं पाहता तिच्या नाशिकमधल्या कार्यक्रमानंतर तिची बॅकस्टेज प्रतिक्रिया ही तिला झालेल्या मानसिक त्रासाची झलकच होती. मी पुरुष मंडळींना हा प्रश्न विचारते की, आपला तसा व्हिडिओ किंवा एखादा फोटो व्हॉट्सअपवर जरी व्हायरला झाला तरी आपण घराबाहेर पडू का? तिचा डान्स ज्यांना पाहायचा नाही, त्यांनी पाहू नये. जुन्या जाणत्यांनी तिची चूक झाली तर तिला फटकारावं. मात्र तिच्या पर्सनल स्पेसमध्ये घुसण्याचा कुणालाही अधिकार नाही. ती स्टेजवर नाचते म्हणून ती काही पब्लिक प्रॉपर्टी नाही. तिला फरक पडतो. सर्वांनाच पडतो. मुद्दा तिच्या स्वाभिमानाचा आहे, तिच्या प्रतिष्ठेचा आहे.

एक ना अनेक उदाहरणं आहेत जी जगाच्या पाठीवर, आपल्या महाराष्ट्रात घडतायत. तिचा मान, तिचा सन्मान, तिची प्रतिष्ठा, तिची मर्जी राखली गेलीच पाहिजे… फक्त 8 मार्चलाच नाही तर वर्षाचे 364 दिवसही! मान्य असेल तरच शुभेच्छा द्या.. नाही तर तोंडदेखले बोलणारे, हसणारे 100 पैकी 99 आहेतच!

धन्यवाद!

वृषाली सारंग यादव, ( लेखिका या टीव्ही9 मराठीच्या अँकर आहेत)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.