मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने मे महिन्यात कार विक्रीत मोठी घट अनुभवल्यानंतर विक्री वाढविण्यासाठी काही वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट जाहीर केली आहे. मारुती सुझुकी त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर सवलत देत आहे. यामुळे कंपनीच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षाही वाढली आहे. तसेच ग्राहकांना त्यांची आवडती कार चांगल्या किंमतीत खरेदी करता येईल.
मारुतीच्या सर्वात स्वस्त 7 सीटर कार इकोवर (Maruti Suzuki Eeco) जून महिन्यात मोठी सवलत दिली जात आहे. व्यावसायिक कामकाजासाठी ही कार मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कारचं मायलेज आणि सिटिंग कॅपेसिटी देखील चांगली आहे.
ग्राहकांना Maruti Eeco च्या खरेदीवर 29,000 रुपयांचे फायदे मिळू शकतात. यामध्ये 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
Maruti Eeco मध्ये 1.2-लीटर क्षमतेचं नॅचुरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन (5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन गियरबॉक्ससह) देण्यात आलं आहे. जे 73PS पॉवर आणि 98Nm टॉर्क जनरेट करतं. ही कार CNG व्हेरिएंटमध्येदेखील उपलब्ध आहे.
या कारचं पेट्रोल व्हेरिएंट 16.11 किमी/ लीटर आणि सीएनजी व्हेरिएंट 20.88 किमी/ किलोग्रॅमपर्यंतचं मायलेज देतं. या कारची किंमत 4.08 लाख रुपये ते 5.29 लाख रुपयांपर्यंत आहे.