शनिवारी संध्याकाळी क्रूझ गोव्याच्या दिशेला रवाना झालं. या क्रूझमध्ये तब्बल तीन दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये ड्रग्जचं सेवन केलं जाणार असल्याची खबर एनसीबीला मिळाली. त्यामुळे जहाजात आधीपासूनच एनसीबी अधिकारीसुद्धा प्रवासी म्हणून शिरले. विशेष म्हणजे जहाजात होणाऱ्या या पार्टीत सहभागी होण्यासाठी 80 हजाराचा तिकीट होतं. मुंबईहून जहाज रवाना झालं. शहरातून लांब गेल्यानंतर जहाजात पार्टी सुरु झाली. नेमकं त्याचवेळेला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. पार्टीत कोकेन, चरस, एमडी, एमडीएमए सारखे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. बॅग आणि इतर वस्तूंमध्ये लपवलेले अंमली पदार्थ एनसीबीने सील केले आहेत. अनेक तास झालेल्या कारवाईत नेमके किती किंमतीचे ड्रग्ज पकडले गेले हे अद्याप समोर आलेलं नाही.