हिमानी कम्प्युटरजीने पुढे ठेवलेल्या प्रश्नांची काळजीपूर्वक आणि खूप विचार करून नेमकी उत्तरे देताना दिसेल. आपल्या जोशाने आणि सकारात्मकतेने सगळ्यांनाच ती मोहित करताना दिसेल. 1 कोटी रु. च्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यानंतर आता तितक्याच उत्साहाने ती 7 कोटी रु. च्या प्रश्नाला सामोरी जाताना दिसणार आहे. हिमानी म्हणाली, “कौन बनेगा करोडपतीमध्ये येणे आणि श्री. बच्चन यांना भेटणे हे पहिल्यापासून माझे स्वप्न होते आणि ते पूर्ण होत आहे, याचा मला खूप आनंद आहे. श्री. बच्चन यांनी मला मोकळेपणा वाटावा यासाठी खूप प्रयत्न केले, त्यामुळे मला अजिबात दडपण आले नाही. त्या दुर्घटनेनंतर माझे आयुष्य सोपे नव्हते. आपली दैनंदिन कामे पूर्ववत करण्यासाठी आम्हा सगळ्यांना खूप कष्ट पडले, विशेषतः माझे आई, वडील आणि बहीण-भाऊ यांना. एक दृष्टिहीन स्त्री असून KBC मध्ये मी मिळवलेल्या यशामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांना आशेची उभारी मिळेल. अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजात प्रवेश तर मिळतो, पण अशा मुलांकडून सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेणार्या शिक्षण संस्था आपल्याकडे नाहीत. मी जे पैसे इथे जिंकले आहे, त्यातून अशा दिव्यांग मुलांसाठी सरकारी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी एक कोचिंग अकादमी सुरू करण्याचा माझा मानस आहे.”