जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. दिएगो मॅरेडोना यांना राहत्या घरी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांची ब्रेन सर्जरी झाली होती. यावेळी त्यांच्या मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठी हटवण्यात आल्या होत्या.
दिएगो मॅरेडोना हे फुटबॉल विश्वातील सार्वकालिन महान खेळाडुंपैकी एक होते. दिएगो मॅरेडोना यांनी आपल्या कौशल्याने फुटबॉलविश्वात अर्जेंटिनाच्या संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांनी चार विश्वचषक स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
1986 मध्ये दिएगो मॅरेडोना यांच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने विश्वचषक जिंकला होता. याशिवाय, बार्सिलोना आणि नेपोली या क्लब्समधूनही ते व्यावसायिक फुटबॉल खेळले होते. मॅरेडोना यांनी नेपोली क्लबला दोनवेळा Serie A हा किताब जिंकवून दिला होता.
फुटबॉलविश्वात अनेक नव्या खेळाडुंसाठी मॅरेडोना हे आदर्श होते. त्यांना फिफाचा प्लेअर ऑफ दी सेंचुरी हा पुरस्कार मिळाला आहे.
दिएगो यांनी इंग्लंडविरुद्ध केलेला गोल ‘हॅड ऑफ गॉड’ म्हणून ओळखला जातो. तर त्याच सामन्यात सहा खेळाडूंच्या मधून चेंडू बाहेर काडून केलेल्या गोलला ‘द गोल ऑफ द सेंचुरी’ असे म्हटले जाते.
दिएगो मॅराडोना मैदानाबाहेरही अनेक कारणांमुळे गाजले. 1991 साली डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर मॅराडोना यांना 15 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. 2008 मध्ये ते अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाले होते.