अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर खचली एक्स गर्लफ्रेंड; म्हणाली “हे सोपं नाही..”
अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. मोजक्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला होता. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे. दीड वर्षापूर्वी अरबाज आणि जॉर्जियाचा ब्रेकअप झाला होता.
प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया अँड्रियानी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक्स बॉयफ्रेंड अरबाज खानविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज हा काही वर्षांपर्यंत जॉर्जियाला डेट करत होता. आता त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला आहे.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली, “अरबाज हा माणूस म्हणून खूप चांगला आहे. होय, आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत आणि जोडीदाराला सोडून दिल्यानंतर मनातील ती पोकळी सहज भरून निघत नाही. एखाद्याला जाऊ देणं इतकं सोपं नसतं. कारण त्या नात्यात तुम्ही गुंतलेले असता.”
“जेव्हा ते नातं संपुष्टात येतं, तेव्हा तुम्हाला आयुष्यात पुढे जावंच लागतं. मी माझ्या आयुष्यातील नव्या टप्प्यात प्रवेश करताना त्यालासुद्धा शुभेच्छा देऊ इच्छिते”, अशा शब्दांत जॉर्जियाने भावना व्यक्त केल्या.
जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अरबाज खान आणि जॉर्जिया अँड्रियानी यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. दीड वर्षापूर्वीच आमचे मार्ग वेगळे झाले, असं जॉर्जियाने याआधी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतरही मनात अरबाजसाठी भावना असल्याची कबुली जॉर्जियाने या मुलाखतीत दिली होती.
“तो माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे आणि माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमीच भावना असतील. मलायकासोबतचं त्याचं नातं कधीच आमच्या नात्यात अडथळा ठरला नव्हता. पण अरबाजची एक्स गर्लफ्रेंड म्हणून माझी ओळख करून दिली तर मला खूप वाईट वाटतं. मला अपमानित केल्यासारखं वाटतं”, असंही जॉर्जिया म्हणाली होती.