थंडीच्या दिवसांत आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. हे केस सुंदर व मऊ-मुलायम व्हावेत यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तुम्ही केसांचा पोत सुधारू शकता. हे पदार्थ केसांना मुळापासून पोषण देतील.
मध - मधामध्ये अंडं, नारळाचे तेल व तिळाचे तेल मिसळून ते एकजीव करावे. हा तयार झालेला मास्क केसांना आणि स्काल्पला लावावा. थोडा वेळ तो केसांवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.
दही- दही हे केवळ शरीरासाठीच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर ठरते. घरात सहजरित्या उपलब्ध असलेल्या दह्याचा तुम्ही कोरड्या व निर्जीव केसांसाठी वापर करू शकता. शांपूने केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना दही लावून ठेवावे. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत.
अंड - अंड्याचा पांढरा भाग तुम्ही केसांसाठी वापरू शकता. त्यासाठी एक अंड फोडून त्याचा पांढरा भाग एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. तो नीट फेसून केसांना लावून ठेवावा व अर्धा तास तसेच राहू द्यावे. त्यानंतर सौम्य शांपूने केस स्वच्छ धुवावेत.
केळं - एका बाऊलमध्ये अर्ध केळं घेऊन ते मॅश करावे. त्यामध्ये एक अंडं फोडून घालावे. ते दोन्ही पदार्थ नीट मिसळून एकजीव करून घ्यावेत. हे मिश्रण केस व स्काल्पवर लावून थोडा वेळ तसेच ठेवावे. त्यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. या उपायांनी तुमच्या केसांना पोषण मिळून ते मुलायम व चमकदार बनतील.