भारताचा अव्वल क्रिकेटपटू, माजी कर्णधार विराट कोहलीला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करुन 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 18 ऑगस्टला आजच्याच दिवशी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवलं होतं.
श्रीलंकेविरुद्ध दांबुलाच्या मैदानावर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिला सामना खेळला. त्यावेळी हा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील मोठा स्टार होईल, असं कोणाला वाटलं नव्हतं.
वनडे डेब्यु मध्ये विराटने असं खास प्रदर्शनही केलं नव्हतं की, क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची फार चर्चा होईल.
पण प्रत्येक सामन्यागणिक भारतच नाही, जगातील क्रिकेट प्रेमींना विराटने आपली दखल घ्यायला भाग पाडलं. विराटने त्याची क्षमता दाखवून दिली. आज तो आऊट ऑफ फॉर्म आहे. पण टॉप क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते.
पहिल्या सामन्यात विराट गौतम गंभीरसह सलामीला आला होता. त्यावेळी फक्त 12 धावा करुन तो बाद झाला. भारताचा त्या मॅच मध्ये 8 विकेटने पराभव झाला.
त्यावेळी वनडे क्रिकेट मध्ये 12 धावांपासून सुरु झालेला विराट कोहलीचा प्रवास आज 12,000 धावांच्या पुढे गेला आहे.
2008 पासून विराट कोहली आतापर्यंत एकूण 262 वनडे सामने खेळलाय. 57.68 च्या सरासरीने 12344 धावा केल्या आहेत. यात 43 शतकांचा समावेश आहे. गोलंदाजी करताना विराटने 4 विकेटही काढल्यात.
टीम इंडियासाठी विराटने ओपनर म्हणून सुरुवात केली होती. आता 3 नंबरवर खेळतो. टीम मधील त्याची ती सेट पोजिशन आहे.
आगामी आशिया कप स्पर्धेद्वारे आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कोहली त्याच्याबाजूने शक्य ती सर्व मेहनत करतोय. विराट कोहलीने सध्या स्पेशल डाएट (Diet) आणि व्यायाम प्रकारांवर लक्ष केंद्रीत केलय.
विराटने सध्या त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल केला आहे. फिट रहाण्यासाठी विराट प्रक्रियायुक्त साखरेचे आणि ग्ल्युटेन असलेले पदार्थ टाळतोय. नेहमीच्या फिटनेस रुटीन मध्येही विराट दुधापासून बनलेले पदार्थ खाणं टाळतो.