जो बायडन अर्थात जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनिअर यांचा जन्म 1942मध्ये पेन्सिलवेनियाच्या स्क्रँटन येथे झाला.
लहानपणीच त्यांचे कुटुंबीय डेलवेअरला राह्यला आले होते. त्यांना कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांची पहिली पत्नी निलीया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या 46व्या वर्षी मुलगा ब्यू याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.
ते डेलवेअरमधून 6 वेळा सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. 1972मध्ये निवडून आलेले ते सर्वात तरूण सिनेटर होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची त्यांची ही तिसरी निवडणूक आहे.
1988मध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाङमय चोरीच्या आरोपमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती.
दुसऱ्यांदा त्यांनी 2008मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला होता.
यंदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयी व्हावेत म्हणून स्वत: बराक ओबामा यांनी बराच प्रयत्न केला.
जो बायडन अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. वाङमय चौर्यापासून ते एका महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणातही ते अडकले होते.
वॉशिंग्टन डीसीमधला अनेक वर्षांचा अनुभव असलेले नेते, उत्तम प्रशासक, परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यासक, कुशल वक्ता आणि भावनिक नेता म्हणून जो बायडन यांच्याकडे पाहिले जाते.