Palace on Wheels: ट्रेन नव्हे तर रुळांवर धावणारा ‘महाल’
Palace on Wheels | पॅलेस ऑन व्हिल्स ही देशातील पहिली लक्झरी ट्रेन आहे. 26 जानेवारी 1982 रोजी ही ट्रेन पहिल्यांदा धावली. राजस्थानातील पर्यटकांमध्ये ही ट्रेन विशेष लोकप्रिय आहे.
पॅलेस ऑन व्हिल्स
Follow us
सध्या देशात कोरोना संकटामुळे पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. मात्र, त्यापूर्वी भारतातील पाच एक्स्प्रेस ट्रेन्स देशी आणि विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरत होत्या. यामध्ये महाराजा एक्स्प्रेस, पॅलेस ऑन व्हिल्स, द डेक्कन ओडिशी, गोल्डन चॅरिएट आणि रॉयल ओरिएंट ट्रेनचा समावेश आहे. यापैकी पॅलेस ऑन व्हिल्स ही एक्स्प्रेस गाडी म्हणजे ट्रेन नव्हे तर रुळावर धावणारा महालच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पॅलेस ऑन व्हिल्स ही देशातील पहिली लक्झरी ट्रेन आहे. 26 जानेवारी 1982 रोजी ही ट्रेन पहिल्यांदा धावली. राजस्थानातील पर्यटकांमध्ये ही ट्रेन विशेष लोकप्रिय आहे.
या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना राजस्थानातील महाल आणि किल्ल्यांची सफर घडवली जाते. या ट्रेनमध्ये 39 डिलक्स केबिन आणि 2 सुपर डिलक्स केबिन्सचा समावेश आहे. प्रत्येक केबिनमध्ये अटॅच्ड वॉशरुम आहे. प्रत्येक केबिनला राजस्थानातील महाल किंवा किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.
या ट्रेनमधील अंतर्गत सजावट ही डोळे विस्फारायला लावणारी आहे. प्रत्येक केबिनला आकर्षक रंग देण्यात आले आहेत. Palace on Wheels मध्ये एक आयुर्वेदिक स्पा देखील आहे. तसेच बार आणि रेस्टॉरंटदेखील आहे. याठिकाणी तुम्ही शाही भोजनाचा आस्वाद घेऊ शकता.
जगातील लक्झरी ट्रेन्सची तुलना करायची झाल्यास Palace on Wheels चा चौथा क्रमांक लागतो. ही ट्रेन दिल्ली ते जयपूर, जयपूर ते सवाई माधोपूर, सवाई माधोपूर ते चित्तोडगड, चित्तोडगड ते उदयपूर, उदयपूर ते जोधपूर, जोधपूर ते जैसलमेर, जैसलमेर ते भरतपूर, भरतपूर ते आग्रा आणि आग्रा ते दिल्ली असा प्रवास करते.
या ट्रेनची अंतर्गत सजावट डोळे दिपवून टाकणारी आहे.
य़ा ट्रेनच्या तिकीटाची किंमतही तशीच आहे. 7 नाइट्स डिलक्स केबिन सिंगल ऑक्युपन्सी (एका प्रवाशासाठी)- 5,23,600 रुपये मोजावे लागतात. तर 7 नाइट्स सुपर डिलक्स केबिनसाठी 9,42,480 रुपये मोजावे लागतात.
तर भारतीय प्रवाशांसाठी या ट्रेनचे प्राथमिक भाडे 2,10,000 आणि 4.5 % सर्व्हिस टॅक्स आहे. तर परदेशी प्रवाशांसाठी 3,500 अमेरिकी डॉलर आणि 4.5 % सर्व्हिस टॅक्स इतके आहे.