सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीत तुफान पाऊस झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह यावेळी गारांचा पाऊस महाबळेश्वर आणि पाचगणी भागात नोंदवला गेला.
अचानक आलेल्या गारांचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची एकच धांदल उडाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचाही खोळंबा झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारा पडल्यामुळे महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीचं प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे. स्ट्रॉबेरी पिकांचं नुकसान झाल्यानं व्यापी आणि स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
हवामान विभागानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासबह जोरदार पावसाची शक्यता आधीच वर्तवली होती. त्यानुसार रत्नागिरी तालुक्याती लांजामध्येही गुरुवारी गारा पडल्या होत्या. आता महाबळेस्वर आणि पाचगणी भागातही गारांचा पाऊस झालाय.
पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा पसरलाय. वाढलेल्या तापमानात लक्षणीय प्रमाणात घट पाऊस झाल्यामुळे नोंदवण्यात आली आहे. शुक्रवार प्रमाणेच शनिवारीही पावसाची हजेरी महाबळेश्वर आणि पाचगणी भागांत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.