शिर्डीसह राहाता , कोपरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. वादळीवारा विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. पावसाने तालुक्याला झोडपले असून अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गहु, कांदा , द्राक्ष तसेच फळबागांना फटका बसला आहे. शेतकरी पावसामुळे हवालदिल झाला आहे. सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास कोसळला जोरदार पाऊस झाला.
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासू ढग दाटून येत आहे. जोरदार सरी ही कोसळत असून आज सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या अर्ध्या तासापासुन अवकाळी पाऊस सुरू झाला असून विजेच्या कडकडाटासह सततधार सुरू आहे. सोसाट्याचा वारादेखील सुटला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नांदेड जिल्ह्य़ातील देगलूर तालुक्यात भर उन्हाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावलीय...मेघगर्जनेसह अर्ध्या तासांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजाची चिंता वाढलीय. काढणीला आलेल्या गहू, हरबरा, ज्वारी, सुर्यफुल पिकांच मोठं नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे... अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला आता रब्बी हंगामालाही मोठा फटका बसणार आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.
शुक्रवारी सकाळपासून पंढरपूर शहरात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात देखील सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. सर्चत्रच पावसाची रिपरिप आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष , आंबा , ज्वारी , डाळिंब , गहू अशा पिकांचे व फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
पिंपरी चिंचवडसह मावळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दोन दिवसांपासून तुरळक पाऊस ही बरसला आहे. आज सायंकाळी मात्र मेघ गर्जनेसह तुफान पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय खरा पण शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसानं हजेरी लावलीय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मार्केट यार्डातील कांद्याची आवक वाढल्याने कांद्याची पोती उघड्यावर राहिल्याने कांदा भिजला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर काढलेली ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेले द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मध्यरात्रीपासून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची रिमझिम सुरूच आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील वाई,वारला,सावळी गावासह परिसरात सायंकाळी पाचच्या दरम्यान जोरदार विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.या अवेळी पावसामुळे काढणीला आलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.