आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा शाही सोहळा आयोजित केला होता. राजेशाही थाटात पार पडलेल्या या सोहळ्याला मनसैनिकांनी हजारोच्या संख्येत उपस्थिती लावली.
आज संपूर्ण दादर भगव्या रंगामध्ये न्हाऊन निघालेलं पाहायला मिळालं. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्याच बरोबर बॅनर्सही लावण्यात आलेत. यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज... या ललकारींनी शिवतीर्थ दुमदुमून गेले
या समारंभाचे प्रमुख वैशिष्ट्य होते ते महाराजांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचे. यावेळी मनसेकडून शिवाजी पार्कवरील महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवष्टी करण्यात आली. हे विहंगम दृष्य शिवभक्तांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतले.
या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. आणि त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली.
या सोहळ्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. या निमित्ताने शिवाजी पार्क परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.