राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी अजित पवारांसोबत पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री व पदाधिकारी श्री सिध्दिविनायकाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाने विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला आहे.
अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना बाप्पाची मूर्ती सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून अजित पवारांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिध्दीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे, असे अजित पवार म्हणाले.
शेवटी जनता - जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत असेही अजित पवारांनी सांगितले.
काल राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. या बैठकीत पक्षाची पुढची वाटचाल कशी असणार आहे, कशा पद्धतीने प्रचार करायला हवा, याबद्दलची रणनिती ठरवण्यात आली.
अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवार देण्यात आले आहेत. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोन जण विधानपरिषदेची निवडणूक लढवताना दिसत आहेत.
आगामी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर सुनील तटकरे यांनी आम्ही सर्वांनी मिळून प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी श्री सिद्धिविनायकाचे पूर्ण पाठबळ आम्हाला मिळेल, हेच आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही इथे आला होतो, असे म्हटले.