बिहार निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आज (12 नोव्हेंबर) पहिल्यांदा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव आपल्या आमदारांसोबत पाहायला मिळाले.
Follow us
बिहार निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आज (12 नोव्हेंबर) पहिल्यांदा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव आपल्या आमदारांसोबत पाहायला मिळाले. यावेळी तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षाच्या नवनियुक्त आमदारांसोबत बैठक घेत सर्वांचे अभिनंद केले. यावेळी तेजस्वी यादव यांनी या सर्व आमदारांसमोर आपल्या पक्षाची पुढील रणनीती काय असणार याविषयी माहिती दिली.
पाटणात झालेल्या राजदच्या आमदारांच्या या बैठकीत तेजस्वी यादव यांना विधीमंडळ नेते म्हणून निवडण्यात आले. महागठबंधन आणि विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी सर्वांचे आभार मानले. या बिहार विधानसभा निवडणुकीत राजदने एकूण 144 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांनी 75 जागांवर विजय मिळवला.
बैठकीनंतर तेजस्वी यादव म्हणाले, “मी अगदी नम्रपणे हात जोडून बिहारच्या जनतेचे आभार मानतो. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बाजूने निकाल दिला आहे. मात्र, जनतेचा निर्णय आपल्यासोबत आहे. 2015 मध्ये देखील आपल्याच बाजूने निकाल आला होता, मात्र तेव्हा भाजप चोरमार्गाने सरकारमध्ये घुसली.”
निकाल आणि निर्णय यात फरक आहे. निवडणुकीचा निकाल जरी एनडीएच्या बाजूने असला तरी जनतेचा निर्णय आपल्या बाजूने आहे, असंही तेजस्वी यादव यांनी नमूद केलं. यावेळी त्यांच्यासोबत राजदचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पाटणामध्ये राबडी देवी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राजदचे नवनियुक्त सर्व आमदार सहभागी झाले होते.
राजदला या निवडणुकीत मागील निवडणुकीच्या तुलनेत 5 जागांचं नुकसान झालंय. त्यांच्या उमेदवारांची विजयाची सरासरी 52 टक्के आहे. राजदला एकूण मतदानाच्या 23.1 टक्के मतं मिळाली आहेत. राजद भाजपपेक्षा एक अधिकचा मतदारसंघ जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय.
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानापासून निवडणुकीच्या रणापर्यंत प्रवास करणारे तेजस्वी यादव यांचा राजकीय अनुभव कमी असला तरी यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या नेत्यांना थेट टक्कर दिली. तसेच आपल्या पक्षाला एक मजबूत स्थितीत ठेवलं.