नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. या चित्रपटात रिंकू राजगुरूने आर्चीची आणि आकाश ठोसरने परश्याची भूमिका साकारली होती. आता आकाशने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे.
'सैराट'मधील आर्ची-परश्या तर देशभरात हिट झाले, परंतु त्याचसोबत चित्रपटातील इतर भूमिकाही विशेष गाजल्या. चित्रपटात खास मित्रांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्यांसाठी आकाशने ही पोस्ट लिहिली आहे.
'सैराट ही आर्ची - परशाची कथा असली तरी मैत्रीचीही आहे. असे प्रेमात आपल्यासोबत मार खाणारे सल्या, बाळ्यासारखे जिवाभावाचे अतरंगी दोस्त सगळ्यांना मिळोत,' असं त्याने लिहिलंय.
या चित्रपटात तानाजी गालगुंडेनं बाळ्याची भूमिका साकारली होती. चित्रपटातील "परश्या.. आर्ची आली आर्ची.." हा त्याचा डायलॉग खूप गाजला होता. चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच तानाजीला खऱ्या आयुष्यातही पायाचा त्रास आहे.
परश्याचा आणखी एक जिवाभावाचा मित्र म्हणजे सल्या. अरबाज शेखने चित्रपटात सल्याची भूमिका साकारली होती. 'सैराट'नंतर तो इतरही मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिकांमध्ये झळकला.
परश्याच्या चांगल्या-वाईट परिस्थितीत हे दोघंही त्याची साथ देतात. त्यामुळे 'सैराट' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होताना आकाशने या दोघांसाठी पोस्ट लिहिणं स्वाभाविक आहे.
'सैराट' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे 'सैराट'ची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.