मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर बुर्लीदरम्यान असणारे बचाप्पा बन बहरले आहे.
कृष्णाकाठी निसर्ग हिरवाईची मुक्तहस्ताने जणू उधळण करत असल्याचे विलोभनीय दृश्य आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी टिपले आहे.
या बनात 'o' आकाराची तांबड्या मातीतील मळकटलेली गाडीवाट आहे. त्याला झाडाच्या फांद्यांप्रमाणे फुटलेल्या असंख्य पायवाटा आहेत. उत्तरेला ऊसाची हिरवीगार शेती, दक्षिणेला संथ वाहणारी कृष्णामाई आहे.
त्याशिवाय बाभूळ, चिचपटी आणि करंजीची हात पसरून उंच उभी असलेली झाडे, गाजरगवत आणि तरवड पावसामुळे सध्या ते हिरवेगार दिसत आहे.
नव्या पालवीची दाटी झालेल्या काळ्या बाबळींनी पिवळ्या पानांचे अलंकार परिधान केले आहेत.
या बाभळींची तांबड्या मातीच्या मळवाटांवर पडलेली ही पिवळी फुलं अधिकच उठून दिसत आहेत.
तसेच बनाला वळसा घालून जाणारा बुर्लीचा वत. या ओढ्याच्या काठावर असंख्य करंजाचे झाप हिरव्या पानांनी लगडले आहेत.
बनातील विविध पक्षांना खाद्य म्हणून सिकाडा, मुंग्या, सुरवंट, वाणीकिडा, तुडतुडे अशा अशा असंख्य किटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
त्यासोबत या ठिकाणी पक्ष्यांची संख्या मोठी असून यात मोर, पोपट, मनोली, सुगरण चिमणी, नाचण, बुलबुल, कावळा हे पक्षी प्रामुख्याने पाहायला मिळतात.
या बनामध्ये मालकोवा, सोनपाठी सुतार, मराठा सुतार, चातक, स्वर्गीय नर्तक, मोहोळ घार, तांबट, रक्तलोचन घुबड, रातवा अशा देशी-विदेशी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे.