गोकुळाष्टमीनिमित्त नाथभक्तांना आसुडांच्या फटकाऱ्यांचा प्रसाद, पनवेलमध्ये गोकुळाष्टमीची साडेतीनशे वर्षांची प्रथा
एकीकडे गोकुळाष्टमी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे उंचच उंच दहीहंड्या, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि बक्षिसांच्या चढाओढीत सणाला आलेलं राजकीय स्वरुप. परंतु पनवेलमध्ये सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे.
Navi Mumbai Dahi handi
Follow us
एकीकडे गोकुळाष्टमी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे उंचच उंच दहीहंड्या, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि बक्षिसांच्या चढाओढीत सणाला आलेलं राजकीय स्वरुप. परंतु पनवेलमध्ये सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे.
पनवेल शहरात मानाच्या 10 ते 12 ठिकाणी नवनाथ संप्रदायातील मंडळींकडून घरगुती स्वरुपात या पारंपारिक उत्सवाचं आयोजन केलं जातं. शेकडो वर्षांपासून जी प्रथा आणि परंपरा आहे, त्याच पद्धतीने आजही पनवेलमध्ये पारंपारिक पद्धतीने गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला गेला.
श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून या उत्सवाला सुरुवात होते. गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजा आरती झाल्यानंतर मानाचे ‘अस्थान’ म्हणजेच नवनाथांचे स्थान असलेली मंडळी अस्थानाबाहेरील रस्त्यावर येतात. यावेळी त्यांच्या अंगावर आसुडाचे फटकारे मारले जातात. पाहणाऱ्याचे मन थक्क करणारे हे दृश्य असतं.
परंतु हे आसुडाचे फटकारे शिक्षा नसून भगवंताचा प्रसाद मानले जातात. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकालाच्या दिवशी कमी उंचीवर बांधलेली दहीहंडी हाताने किंवा काठीने फोडली जाते. गेली अनेक वर्षे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात.
परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत ही प्रथा पार पडली. पनवेल शहराला सांस्कृतिक आणि पारंपारिक वारसा आहे. कोणताही धांगडधिंगा न करता धार्मिक पूजाअर्चा आणि प्रथेप्रमाणे रुढी परंपरेचा वारसा पुढे नेणारी पनवेल शहरातील सण उत्सव साजरे करण्याची ही प्रथा आदर्शवत मानली जाते.