Uddhav Thackeray : फक्त तिरंगा फडकवल्याने देशभक्त होता येत नाही ते हा कसला अमृत महोत्सव?, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 7 प्रमुख मुद्दे
Uddhav Thackeray : अतिवृष्टीने शेतकरी बेहाल आहे. पण सरकार आहे कुठे? काहीही न करता सत्कार करून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचे खाते वाटप नाही. सर्व मंत्री आज आझाद आहेत. कुणावरच काही बंधन नाही. आझादी का अमृत महोत्सव.
मुंबई: देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. देशातील परिस्थितीवरून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केवळ तिरंगा फडकवल्याने कुणालाही देशभक्त होता येत नाही. इथे लोकांना राहायला घर नाही आणि घर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपचा (bjp) समाचार घेतला. तसेच अमृत महोत्सवी वर्षात जर लोकशाहीला मृतावस्थेत नेत असाल तर हा कसला अमृत महोत्सव, असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चढवला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. निमित्त होतं साप्ताहिक मार्मिकच्या वर्धापन दिनाचं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ऑलाईन संवाद साधला.
आसूड आणि फटकारे
- मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणांचा ओढा कायम राहिला आहे. व्यंगचित्रकार काय असतो. तो काय करू शकतो याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मराठी माणूस आणि हिंदूचं काय झालं असतं हे लक्षात येतं. शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं. मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला. मी का सांगतोय तर काही लोकांना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे. कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमूळं 62 वर्षांपासून रुजलेली आहेत.
- एक ब्रशचा फटकारा पडला तर निपचित पडलेली मने पेटून उठतात हे बाळसााहेबांनी करून दाखवलं आहे. ही आपली शिवसेना आहे. व्यंगचित्रकारांना विनंती करतो, देशभरातील 1947 पासूनची व्यंगचित्रं गोळा करा. देशभरातील कार्टुनिस्टची कार्टुनं गोळा करा. 1947 सालापासून आपला प्रवास कसा सुरू झाला हे दिसेल. माणसं बदलतात काळ बदलतो. पण परिस्थिती आहे तीच आहे. बाळासाहेबांची चित्रे 1980ची अजूनही परिस्थितीला लागू करणारी आहे. माणसं बदलली, काळ बदलला तरी परिस्थिती तीच आहे. नुसतं तिरंगा फडकवला म्हणून देशभक्त झालो. राष्ट्रभक्त झालो. आपल्याला वाटतं भारत माताही जणू काही आपलीच मालमत्ता आहे. तसं नाहीये. तिची खरी व्यथा आहे. अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो. ती व्यथा मांडण्याचं काम मार्मिकने केलं आहे.
- मी कुणावर कॉमेंट करावी म्हणून व्यंगचित्रं दाखवत नाही. 1978 सालचं हे व्यंगचित्रं आहे. त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. तो काळ भोगलेला वर्ग अजूनही आहे. त्यांना तो काळ आठवत असेल तर त्यांना हे व्यंगचित्रं समजेल. व्यंगचित्रावर वर लिहिलंय ‘परतीचा प्रवास’. त्यावर कमेंट केली. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाई सारखा हेकडी माणूस पंतप्रधानपदी बसल्यावर जे व्हायचे ते झाले. मोरारजींची हेकडीवृत्ती लोकशाहीस पुन्हा त्या अंधाऱ्या खाईत घेऊन गेली. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणून हे चित्रं दाखवतोय. त्यामुळे 75व्या वर्धापन दिनी आपण कुठे आहोत. आपल्या देशातील लोकशाही किती काळ जिवंत राहणार आहे. याचा एक आढावा घेण्याची गरज आहे. आज पाहिलं तर आनंदी आनंद आहे. 75वा वर्धापन दिन आहे. मायबाप सरकारने हर घर तिरंगा, घर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. त्यावर एक व्यंगचित्रं काढलंय. कुणी काढलं माहीत नाही. सरकारी बाबूच्या समोर एक माणूस आहे. तो म्हणतोय सर याच्याकडे तिरंगा आहे. पण घर नाही. त्याला घर हवं आहे, असं हे कार्टुन आहे. म्हणजे घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झाली आहे. घर घर तिरंगा. लावा. तुमच्याकडे घरच नाही तर तिरंगा लावणार कुठे?
- आझादी म्हणजे काय? स्वातंत्र्य काय? ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलो. त्याला 75 वर्ष झाली. आता अमृत महोत्सव करताना पुन्हा गुलामगिरीकडे चाललोय का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण सगळीकडे घर घर तिरंगा लावताना राजकारण आपल्या पाचवीला पुजलं आहे. लोकशाही म्हटल्यावर निवडणुका आल्या, राजकीय पक्ष आले. आलेच पाहिजे. प्रत्येकाचं मत समान नसेलच. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची, मुभा मांडण्याची परवानगी असलीच पाहिजे. त्यालाच लोकशाही म्हणतात. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते लोकशाहीला घातक आहे की नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होतो. उद्या पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे. हे येणं जाणं सुरूच असतं. पण नड्डा जे बोलले या देशात एकच पक्ष राहणार आहे. बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. विशेषता शिवसेना संपत चालली आहे. बघू. त्यांनी प्रदेशाध्यक्ष केला. त्यांच्या नावात किती कुळे आहेत माहीत नाही. पण त्यांची किती जरी कुळं उतरली तरी ते शिवसेना नष्ट करू शकत नाही. मग ते 52 असतील किंवा 152 असतील. मला काही फरक नाही पडत. लोकशाहीला घातक प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचं.
- देशातील मांडणी झाली. संघराज्य आहे. त्यात सर्व राज्य आहे. ही घटक राज्य एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं आहे. ही सर्व राज्य एकत्रं आल्याने त्याला संघराज्य म्हणतात. मग नड्डांना काय म्हणायचं आहे? प्रादेशिक पक्ष संपवायचे म्हणजे त्यांना संघराज्य संपवायचं आहे का? हे संघराज्य नको हे तुमचं मत देशाच्या नागरिकांचं मत आहे का? त्यावर निवडणुका व्हायला हव्यात. आज तुम्ही गादीवर बसलात म्हणून हम करे सो कायदा चाललं आहे. ही लोकशाही नाही. ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाही. अमृत महोत्सव अमृता सारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला आला?
- डीपीवर तिरंगा टाकायचाच. आपल्याकडे सोशल मीडिया जोरात आहे. पण जे चाललंय ते सोसल का? स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी करण्यासाठी सीमेवर जे उभे आहेत, तिथे लष्करात कपात करणार आहात. शस्त्र घेण्यासाठी माणसं कमी करणार असाल तर शस्त्र कुणाच्या हातात देणार? चीन, रशिया, अमेरिकेने तरी आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं माझ्या वाचनात नाही. लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. पण राज्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत हे कोणतं स्वातंत्र्य आहे? ज्यांच्यामुळे तिरंग्याचं रक्षण होतं. ज्यांच्यामुळे घरावर डीपीवर तिरंगा लावू शकतो, त्या लष्कराची कपात करत असाल तर त्याला काय अर्थ आहे. घरात बसून बेंबीच्या देठापासून भारत माता की जय म्हटल्याने शत्रू पळणार नाही. उद्या माझ्या घरावर तिरंगा लावलेला बघून चीन काय पळून जाणार आहे का? घराघरावर तिरंगा का लावला पाहिजे? तर देशाचं रक्षण करणाऱ्यांना मी एकटाच नाही. माझ्यासोबत देशही आहे हे दिसलं पाहिजे.
- अतिवृष्टीने शेतकरी बेहाल आहे. पण सरकार आहे कुठे? काहीही न करता सत्कार करून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचे खाते वाटप नाही. सर्व मंत्री आज आझाद आहेत. कुणावरच काही बंधन नाही. आझादी का अमृत महोत्सव. मंत्र्यांचं चाललंय. पदं मिळाली. पण जबाबदारी नाही. करा, मजा करा. ही अशी मौजमजा मस्ती आहे. त्यावर ब्रशचे फटकारे मोठं काम करतात.
हे सुद्धा वाचा