मुंबई: शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील खदखद आणि वेदना बोलून दाखवल्या. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतानाच अरविंद सावंत, अनिल परब आणि विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) आणि अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडण्याचा आरोप केला. कदम एवढ्यावरच थांबले नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फुटलेले 50 आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि फुटणाऱ्या 12 खासदारांचेही आभार मानले. या लोकांनी बंड केलं नसतं तर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा आमदारही निवडून आले नसते, असा दावाही त्यांनी केला. आपण बोललो तर भूकंप होईल, असा इशारा देतानाच त्यांनी आपण शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं. कदम यांच्या पत्रकार परिषदेतील दहा मुद्दे खालील प्रमाणे.
मीच राजीनामा समोरून दिलाय. तर हकालपट्टींचा प्रश्न येतोच कुठे? तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार आहात? उलटपक्षी उद्धवजींनी 52 वर्ष काम करणारा नेता राजीनामा देतोय, तर कमीत कमी एक फोन तरी करायला पाहिजे. या रामदासभाई काय झालं? बोलू आपण. काहीच नाही. थेट हकालपट्टी.
काही झालं तरी हकालपट्टी. आनंदराव अडसूळ हकालपट्टी, शिवाजीराव पाटील हकालपट्टी, रामदास कदम हकालपट्टी, एकनाथ शिंदे हकालपट्टी, आमदार हकालपट्टी, नगरसेवक जात आहेत हकालपट्टी, एवढंच काम आहे का? हकालपट्टीची वेळ का येते? याचं आत्मपरीक्षण करणार की नाही? त्याचा अभ्यास कोण करणार? ही वेळ कुणामुळे येते? आजबाजूला कोण आहे?
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाची शिवसेना या घोषवाक्यांने सुरुवात केली. त्यांनी हिंदुत्वासाठी अख्खं आयुष्य घालवलं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आयुष्यभर संघर्ष केला. त्या शिवसेनाप्रमुखांचा चिरंजीव राष्ट्रवादीसोबत बसून मुख्यमंत्री होतो हे कळल्यावर मी त्यांना हात जोडले. म्हटलं उद्धवजी, हे पाप करू नका. हे साहेबांना आवडणार नाही. आपल्या पक्षाची ताकद वाढवू. व्हा तुम्ही मुख्यमंत्री. आपले आमदार निवडून आणू. पण साहेबांचं असं स्वप्न नव्हतं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष केला. त्यांना घेऊन मुख्यमंत्री व्हा, असं स्वप्न साहेबांचं नव्हतं. साहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं.
उद्धव ठाकरे आजारी होते. ते बाहेर पडत नव्हते. त्याचा फायदा शरद पवार आणि अजितदादांनी घेतला. मी उद्धव ठाकरेंना एक पत्रं पाठवलं होतं. त्यात शरद पवार कुणबी समाजाला बोलवून घेऊन कुणबी भवनासाठी 5 कोटी देतो, तुम्ही शिवसेना सोडून राष्ट्रवादीत या असं सांगितलं. पाच कोटी दिले. पैसे शासनाचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवारांनी कुणबी कार्यकर्त्यांना फोडून राष्ट्रवादीत घेतलं. मी उद्धव ठाकरेंना फोटो पाठवले. अजितदादा चेक देतानाचे फोटो दिले. मी सातत्याने मी हे साांगितलं. आमदारांनीही सांगितलं. अजितदादा पडलेल्या आमदारांना बोलावून आमच्या मतदारसंघात पैसे देताहेत. आणि आम्हाला निधी मिळत नाही, हे प्रत्येक आमदार सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण उद्धव ठाकरे कुणाला भेटत नव्हते. एकनाथ शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केला.आम्ही केला. पण उद्धव ठाकरेंचं पवारांवरील प्रेम काही कमी होत नव्हतं.
मी एकनाथ शिंदेंचे आमदार मानतो. 51 आमदारांचे आभार मानतो. 12 खासदारांचे अभार मानतो. नगरसेवक आणि जिल्हा परिषद ससद्यांचे आभार मानतो. त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना संपवली असती.
उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवर एवढं प्रेम का? हेच तर मला कळत नाही. कोडं उलगडत नाही. रात्री दोन दोन वाजता उठून बसतोय. जेवण जात नाही. तेच माझंही दु:ख आहे. आपला पक्ष फुटतोय. आपल्या पक्षात उभी फूट पडतेय. तरी मी शरद पवारांना सोडत नाही. पक्ष संपला तरी चालेल. हे का होतंय? नेमकं आजूबाजूला सांगणारे लोक कोण आहेत?
शिंदेंनी बंड केलं नसतं तर पुढच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात दहा आमदारही निवडून आले नसते. मी शिवसेना जोडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. शिंदे गुवाहाटीला असताना मी प्रयत्न केला होता. माझ्या प्रयत्नाला यश आलं होतं. शिंदे म्हणाले, उद्धवजींना सांगा राष्ट्रवादीची साथ सोडा. आम्ही मातोश्रीत येतो. पण पवार मातोश्रीत गेले. त्यांनी काही तरी गुरुकिल्ली दिली. आणि सर्व पुन्हा वाया गेलं. नंतर कायदेशीर कारवाई सुरू झाली.
सोडून द्या हो, माझ्या सारख्या माणसावर कोण आरोप करेल? यांची हिंमत काय आहे? कोण अरविंद सावंत? आणि कोण तो विनायक राऊत? त्यांची औकात आहे का माझ्यावर बोलायची? त्यांची औकात आहे का? शिवसेनेसाठी 52 वर्ष योगदान दिलंय. अंगावर अनेक केसेस घेतल्या. तुरुंगात गेलो. औकात आहे का माझ्यावर बोलायची? 2005मध्ये बाळासाहेबांनी बेळगावला पाठवलं होतं. गुन्हा दाखल झाला होता. त्याचा कालच 10 लाखाचा जामीन घेतला. हे काय मला पक्ष शिकवत आहेत? शिवसेनेसाठी जीवाचं रान करणारा आहे मी. माझा मर्डर करण्यासाठी सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. बायका मुलं नव्हती का आम्हाला? कोण अरविंद सावंत लंX … हे यांची औकात आहे का माझ्या समोर. आमदार जातात, फूट पडली. ही मिलीभगत आहे का? मीडिया दिसतो म्हणून तोंडाला वाटेल ते बोलायचं?
भविष्यात माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल बाळासाहेबांची शिवसेना अभेद्य राहिली पाहिजे. पुन्हा भगवा फडकला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वाढली पाहिजे. आता मी महाराष्ट्राच्या बाहेर पडणार. जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे मी दौरे करणार. उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती आहे की मी नाईलाजाने मी राजीनामा दिला. मला समाधान नाही. माझ्या मुळावरच तुम्ही उठला. माझ्या मुलाला राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त करायला निघाला. आताही उठत आहात. मी फार संयम पाळला. प्रचंड संयम पाळला. मी काय चूक केली. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी नाही बोलणार. मी बोललो तर भूकंप होईल. मला तुटलेल्या गोष्टी जोडायच्या आहेत. तो प्रयत्न मी करणार आहे.
पावणे तीन वर्ष मी मातोश्रीवर गेलो नाही. पण उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांचं अभिनंदन केलं. या भXव्याला काय माहीत आहे. लंX आहे तो. ते काय पण बोलतंय लंX ते. मी उद्धवजींना खूर्चीत बसवलं. त्यांना गुच्छ दिला.