12 आमदार नियुक्ती वाद, राष्ट्रवादीने यादी बदलल्याची चर्चा, राजू शेट्टींचं नाव वगळलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी 1 सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली.
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा वाद अजूनही कायम असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव कट केल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या ऐवजी आता दुसऱ्या नावाचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे 12 आमदारांच्या नावांची यादी पुन्हा राज्यपालांकडे सादर केली जाणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी 1 सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीची कोंडी फोडण्यासाठी ही भेट घेण्यात आली. 26 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आली नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबरला भेटीसाठी वेळ देण्यात आली होती.
एकनाथ खडसे, राजू शेट्टींचा पत्ता कट?
दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजू शेट्टी यांच्या ऐवजी दुसरं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. तर खडसे यांची ईडी चौकशी सुरु असल्यानं राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून त्यांच्या नावाला आक्षेप घेतला जाऊ शकतो, असंही बोललं जात आहे.
राज्यपालांचा कोणत्याही नावाला आक्षेप नाही : अजित पवार
राज्यपालांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटने केला होता. परंतु त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.
यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, ज्या 12 जणांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवली आहे, त्यावर राज्यपालांचा काही आक्षेप आहे का? यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी याविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही. या नियुक्तीचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही केवळ विनंती केली की, हा प्रश्न लवकर सोडवला तर बरं होईल. यावर राज्यपाल म्हणाले की, ठिक आहे, मी सगळं ऐकून घेतलं आहे, त्यामुळे मी यावर योग्य तो निर्णय घेईन.
12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?
काँग्रेस
1) सचिन सावंत 2) रजनी पाटील 3) मुजफ्फर हुसैन 4) अनिरुद्ध वनकर
राष्ट्रवादी काँग्रेस
1) एकनाथ खडसे 2) राजू शेट्टी 3) यशपाल भिंगे 4) आनंद शिंदे
शिवसेना
1) उर्मिला मातोंडकर 2) नितीन बानगुडे पाटील 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी
संबंधित बातम्या
राज्यपालांचा ठाकरे सरकारच्या 12 नावांवर काही आक्षेप आहे का? अजित पवारांचं भेटीनंतर पहिलं उत्तर